सोलापूर; पुढारी वृत्तसेवा: महिलेवरील दुष्कर्मप्रकरणी गुन्हा दाखल झालेले भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे न्यायालयाच्या आदेशानुसार आज (दि. २६) सकाळी सदर बझार पोलीस ठाण्यात हजेरी देण्यासाठी दाखल झाले. यावेळी पोलीस अधिकार्यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडे चौकशी केल्याचे समजते. त्यांना २६ आणि २७ जुलैरोजी पोलीस ठाण्याला हजेरी देण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी दिला आहे.
एका महिलेवर केलेल्या कथित दुष्कर्मप्रकरणी माजी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अंतिम अटकपूर्व जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश शिरभाते यांनी देशमुख यांना पोलीस ठाण्यास हजेरी देण्याच्या अटीवर त्यांना अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार देशमुख हे त्यांचा भाऊ व अॅड. बाबासाहेब जाधव यांच्यासमवेत हजर झाले.
सदर बझार पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्यासमोर हजर झाल्यानंतर पोलीस निरीक्षक भोसले यांनी देशमुख यांना सहायक पोलीस आयुक्त माधव रेड्डी यांच्यासमोर नेले. त्याठिकाणी देशमुख यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधिकार्यांनी चौकशी केल्याचे समजते. हजेरीचा कालावधी व चौकशी पूर्ण झाल्यानंतर देशमुख हे अॅड. जाधव यांच्यासमवेत कारमधून निघून गेले.
दरम्यान, श्रीकांत देशमुख यांनी लग्नाचे आमिष दाखवून मुंबई, सोलापूर, पुणे, सांगली इत्यादी ठिकाणी दुष्कर्म केल्याचा आरोप मुंबई येथील एका महिलेने केला आहे. मात्र, लग्न न करता फसवणूक केल्याची फिर्याद त्या महिलेने पुणे येथील डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी ती सोलापूरच्या सदर बझार पोलीस ठाण्यात वर्ग केली आहे.
हेही वाचलंत का ?