Gustav Mckeon : फ्रेंच क्रिकेटरचा T20 मध्ये विश्वविक्रम! शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू | पुढारी

Gustav Mckeon : फ्रेंच क्रिकेटरचा T20 मध्ये विश्वविक्रम! शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू

पुढारी ऑनलाईन डेस्क : फ्रान्सचा सलामीवीर गुस्ताव मॅसिओनने (Gustav Mckeon) टी 20 (T20) विश्वचषक 2024 युरोप सब रिजनल क्वालिफायर टूर्नामेंटमध्ये इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात शतक झळकावणारा तो सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे. वयाच्या 18 वर्षे 280 दिवसांमध्ये त्यांनेही किमया केली आहे. गुस्तावने वांता येथे खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात 61 चेंडूत 109 धावांची शानदार खेळी साकरली.

गुस्तावने (Gustav Mckeon) आपल्या खेळीत पाच चौकार आणि नऊ षटकार लगावले. गुस्तावने या धमाकेदार खेळीने अफगाणिस्तानच्या हजरतुल्ला झाझाईचा विक्रम मोडला. हजरतुल्लाहने 2019 मध्ये आयर्लंडविरुद्ध 62 चेंडूत 162 धावांची नाबाद खेळी खेळली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये शतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला होता. त्यावेळी हजरतुल्लाचे वय 20 वर्षे 337 दिवस होते.

फ्रान्सचा मॅसिओन (Gustav Mckeon) सध्याच्या स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत टी 20 विश्वचषक 2024 युरोप सब रिजनल क्वालिफायर टूर्नामेंटमध्ये 161 च्या स्ट्राइक रेटने आणि 92.50 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये (185 धावा) अव्वल स्थानावर आहे. याच स्पर्धेत त्याने झेक प्रजासत्ताकविरुद्ध 54 चेंडूत 76 धावा केल्या होत्या.

मॅसिओनच्या (Gustav Mckeon) शतकानंतरही फ्रेंच संघाला विजय मिळवता आला नाही आणि स्वित्झर्लंडने 158 धावांचे लक्ष्य गाठून हा सामना जिंकला. स्विस कर्णधार फहीम नाझीरने 46 चेंडूत 67 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यानंतर अली नय्यरच्या तुफानी फलंदाजीने स्वित्झर्लंडला सामना जिंकून दिला.

नय्यरने तीन चेंडूंत 12 धावा केल्या. नय्यरने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून विजय मिळवला. यामुळे फ्रान्स आणि मॅसिओनचे सामना जिंकण्याचे स्वप्न भंगले. या विजयासह स्वित्झर्लंडचा संघ दोन गुणांसह फ्रान्ससोबत बरोबरीत आहे. दोघेही एकाच गटात आहेत. त्याचबरोबर नॉर्वेचा संघ गट 2 मध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याने झेक प्रजासत्ताक आणि एस्टोनियावर विजय मिळवला आहे.

आंतरराष्ट्रीय T20 मध्ये शतक झळकावणारे सर्वात तरुण खेळाडू

खेळाडू : वय : सामना : ठिकाण : वर्ष

गुस्ताव्ह मॅसिओन : 18 वर्ष 280 दिवस : फ्रान्स विरुद्ध स्वित्झर्लंड : वांता, 2022
हजरतुल्ला जझाई : 20 वर्ष 337 दिवस : अफगानिस्तान विरुद्ध आयर्लंड : डेहराडून, 2019
शिवकुमार पेरियालवार : 21 वर्ष 161 दिवस : रोमानिया विरुद्ध तुर्की : इल्फोव्ह काउंटी, 2019
ऑर्किड ट्युसेंज : 21 वर्ष 190 दिवस : रवांडा विरुद्ध सेशेल्स : किगाली, 2021
दीपेंद्र सिंह : 22 वर्ष 68 दिवस : नेपाळ विरुद्ध मलेशिया : काठमांडू, 2022

 

Back to top button