नाशिक : सतीश डोंगरे
भारतात पाण्याचे इकोसिस्टीम असले तरी गेल्या काही काळात ज्या पद्धतीने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत आहे, त्यावरून आपल्या पूर्वजांनी शोधलेल्या जलपुरवठा पद्धतीचे पुनर्जीवन करण्याची गरज निर्माण झाली आहे. होय, कधी काळी 'बारवांचा महाराष्ट्र' अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रातील बारव मृत स्थितीत असल्याने जलव्यवस्थापन अन् स्थापत्यशास्त्राचा हा अद्भूत नमुना जमीनदोस्त आहे. सध्या या बारवांचा श्वास मोकळा करण्यासाठी राज्यातील तरुणांकडून 'महाराष्ट्र बारव मोहीम' राबविली जात असून, आतापर्यंत 1800 पेक्षा अधिक बारवांचा शोध घेण्यात त्यांना यश आले आहे.
बारव आणि पुष्करणी पाणीटंचाईच्या प्रश्नावर उत्तर ठरू शकतात, हा विचार समोर ठेवून राज्यातील बारवांचा शोध घेऊन त्यांना पुनर्जीवन करण्यासाठी या मोहिमेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. आज आपल्या घराघरांत नळ असल्याने बारवांकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र, आपल्या पूर्वजांनी खूपच विचारपूर्वक भूजलाच्या जिवंत स्रोतांवर बारव बांधल्या आहेत. सध्या या बारव गाळाने भरलेल्या, ढासळलेल्या असल्याने, त्यांचे पुनर्जीवन करण्याची गरज आहे. जलतज्ज्ञांच्या मते, जर बारवांच्या आजूबाजूला रेनवॉटर हार्वेस्टिंग केले, तर सतत पाणीपुरवठा उपलब्ध होऊ शकतो. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भ या दुष्काळी भागांत बारव जलव्यवस्थापनासाठी आजही प्रभावी ठरू शकतात. भूमीअंतर्गत जलस्त्रोतांचा अचूक अंदाज घेत बांधलेल्या या बारव नुसत्या स्थापत्यशास्त्रातील प्रगतीची उदाहरणे नव्हेत, तर भूजलशास्त्रातील प्रगतीचीही चिन्हे आहेत. चांद बावडी, राणी की बाव अशा काही बारव जागतिक वारशात नोंदवल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रात सहाव्या शतकापासून बारवांची बांधकामे वाढत गेली. यादवकाळात मोठ्या प्रमाणात बारवा बांधल्या गेल्या. ब्रिटिशकाळात मात्र ही परंपरा खंडित झाली, ती आजतागायत कायम आहे. मात्र, ज्या बारव बांधल्या गेल्या त्यांचे पुनर्जीवन केल्यास, महाराष्ट्रातील पाणीप्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. त्याकरिता शासनाच्या पुढाकाराची गरज असल्याचे इतिहासप्रेमी सांगतात.
35,000 बारव पुणे-सोलापुरात – ब्रिटिशांनी केलेल्या नोंदीनुसार पुणे जिल्ह्यात 35 हजारांपेक्षा अधिक बारव आहेत. पाठोपाठ सोलापूर जिल्ह्यात 35 हजारांच्या आसपास बारवांची नोंद आहे. ही संख्या ब्रिटिशांनी गॅझिटियरमध्ये पायविहिरी या नावाने नोंदवून ठेवली असल्याचे आढळून येत असले तरी, या बारवांचा शोध लागल्यानंतरच खरा आकडा स्पष्ट होऊ शकेल.
महाराष्ट्रातील आतापर्यंत शोधलेल्या बारव –
पश्चिम महाराष्ट्र – 398
दक्षिण महाराष्ट्र – 357
कोकण – 360
मराठवाडा – 306
पश्चिम विदर्भ – 228
उत्तर महाराष्ट्र – 155
(ही संख्या 1650 इतकी असून, सद्यस्थितीत ती 1800 पर्यंत पोहोचली आहे. यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.)
पर्यटनासाठी महत्त्व –
* धुळ्यातील अहिल्यापूर बारव स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध
* परभणीसाठी वालूर बारवचा आकार आकाशगंगेसारखा असून, जगात अशा आकाराची बारव कुठेही नाही. तर पिंगळी येथील बारव पुष्करणी आकाराची आहे.
* पुणे, आंबेगाव, मंचर येथील बारव कुंडाच्या आकाराची आहे.
* औरंगाबाद, शेकटा येथील बारव सुस्थितीत असून, वास्तू स्थापत्य कलेचा सुंदर नुमना आहे.
* अमरावती येथील बारवच्या पाचमजली पायर्या खाली उतरत जावे लागते.
* अहमदनगर येथील हत्ती बारवच्या पायर्या आकाराने मोठ्या असून, याठिकाणी हत्ती पाणी पिण्यासाठी खाली उतरत असल्याचे बोलले जाते.
पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन – बारव आणि पायविहिरी एकच असून, केवळ विहीर हा वेगळा प्रकार आहे. बारवांची खोली ही एका मर्यादेपेक्षा अधिक नसते. शिवाय यातील पाण्याची पातळी एका मर्यादेपेक्षा अधिक वाढत नाही. बारवांमध्ये पायर्या असल्याने, पाण्यापर्यंत जाणे शक्य होते. सर्वांत महत्त्वाचा वैज्ञानिक उद्देश असा की, जमिनीत जे भूजलाचे साठे असतात, त्यातील एका केंद्रबिंदूवर बारव खोदलेली असल्याचे आढळून येते. अशा रचनेमुळे जमिनीखाली निर्माण होणार्या हवेच्या पोकळीतून हवा बाहेर पडण्यास मदत होते, शिवाय यामुळे आजूबाजूंच्या विहिरींची पाणीपातळीही वाढते. पूर्वजांनी या सर्व बाबींची जाणीव ठेवून बारवा खोदल्या. त्याचबरोबर बारवांच्या ठिकाणी मंदिरेही उभारली. जेणेकरून बारवांची स्वच्छता राखण्यास मदत होईल.
20 हजार बारवांचा शोध – ऐन लॉकडाऊनमध्ये (2020) महाराष्ट्रातील बारव शोधण्याची मोहीम सुरू केली. आतापर्यंत 1800 बारव शोधून त्या पुनर्जीवित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील 20 हजार बारव शोधण्याचा ध्यास असून, त्या पद्धतीने काम सुरू आहे. – रोहन काळे, महाराष्ट्र बारव मोहीम.
नाशिकमध्ये 500 च्यावर बारव – शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील कित्येक बारवांचा श्वास मोकळा केला आहे. नाशिक जिल्ह्यात पाचशेपेक्षा अधिक बारवांची संख्या असून, त्या शोधून त्यांचे पुनर्जीवन करण्यासाठी धडपड सुरू आहे. – राम खुर्दळ, अध्यक्ष, शिवकार्य गडकोट संवर्धन.