पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात भूजल उपशाचे प्रमाण जास्त आहे. भूजल उपशामुळे फळ बागायत, तसेच कृषी क्षेत्रासाठी होणारा उपसादेखील जास्त वाढला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तसेच, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून संपूर्ण देशासाठीचा 2022 चा वास्तविक भूजल स्रोत मूल्यांकन अहवाल जाहीर करण्यात आला आहे. या अहवालानुसार राज्यातील 80 तालुक्यांत भूजल पातळी कमी आहे.
राज्यातील 1339 गावांत भूजल वाढीसाठी अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे. या गावांत केंद्र सरकार आणि जागतिक बँक यांच्या अर्थसाहाय्याने अटल भूजल केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येत आहे. योजनेकरिता प्राप्त होणार्या निधीपैकी 50 टक्के निधी केंद्र शासन, तर उर्वरित 50 टक्के निधी जागतिक बँकेकडून अनुदान आणि प्रोत्साहन स्वरूपात दिला जाणार आहे. 'केंद्राच्या भूजल स्त्रोत मूल्यांकन अहवालानुसार राज्यातील 272 पाणीस्त्रोत सुरक्षित आहेत.
स्थानिक ग्रामस्थांना गावांतील भूजल किती हे सांगून जलअंदाजपत्रक देण्यात येत आहे. तसेच, हे भूजल किती दिवस पुरू शकेल, याची माहिती देण्यात येत आहे. भूजलाची मागणी कमी करण्यासाठी ठिबक सिंचनासाठीच्या कार्यशाळा घेण्यात येत आहेत. जास्त पाणी लागणार्या पिकांऐवजी कमी पाणी लागणार्या पिकांच्या लागवडीसाठी जनजागृती करण्यात येत आहे. हिवरे बाजारप्रमाणे पाण्याचे नियोजन या गावांत करण्याचे प्रयत्न आहेत,'अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी सांगितली.
भूजल वाढविण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतील गावांचा समावेश करण्यात आला आहे
जिल्हा तालुके ग्रामपंचायती
पुणे तीन 110
सातारा तीन 114
सांगली चार 93
सोलापूर चार 115
नाशिक दोन 116
नगर तीन 101
जळगाव चार 101
जालना तीन 50
लातूर चार 121
उ.बाद दोन 55
अमरावती तीन 217
बुलडाणा एक 68
नागपूर दोन 78