पुणेकर वापरतात मापदंडापेक्षा जास्त पाणी: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात माहिती

पुणेकर वापरतात मापदंडापेक्षा जास्त पाणी: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात माहिती
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि केंद्रीय सार्वजनिक आरोग्य मंडळ यांनी दिलेल्या मापदंडापेक्षा पुणेकर जास्तीचे पाणी वापरतात, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून महापालिका वर्षाला तब्बल 20 अब्ज घनफुटांपेक्षा (टीएमसी) जास्त पाणी वापरते. तरीदेखील महापालिकेत 34 गावे समाविष्ट झाल्याने खडकवासला प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील निवासी करण्यात आलेल्या सिंचन क्षेत्राचे पाणी महापालिकेला उपलब्ध करून देण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार माधुरी मिसाळ, संजय जगताप आणि इतर लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, 'जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि केंद्रीय सार्वजनिक आरोग्य मंडळ यांनी दिलेल्या मापदंडापेक्षा पुणे महानगरपालिका जास्तीचे पाणी वापरत आहे. त्या अनुषंगाने जलसंपत्ती प्राधिकरण ठोक जलदराप्रमाणे महापालिकेला दंडनीय आकारणी करण्यात येते.'

दरम्यान, महापालिकेकडून 10 डिसेंबर 2021 च्या पत्रान्वये महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या 11 गावे आणि नव्याने समाविष्ट 23 गावांसाठी वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने घरगुती व औद्योगिक वापरासाठी मुळशी धरणातून पाच अब्ज घनफूट (टीएमसी) वाढीव पाण्याची मागणी केली आहे. महापालिकेला सन 2031 साली होणार्‍या 76 लाख 16 हजार एवढ्या लोकसंख्येसाठी राज्य शासनाने प्रतिवर्षी 14.61 टीएमसी पाणी देण्यास यापूर्वीच मंजुरी दिली आहे.

कालवा दुरुस्ती लवकरच
खडकवासला धरणसाखळी प्रकल्पांतर्गत येणारे कालवे, बंधार्‍यांची दुरवस्था झालेली नाही. या कालव्यांचे नियमित परीक्षण व दुरुस्ती करण्यात येते आणि त्याआधारे कालव्यातून सिंचनासाठी पाणी देण्यात येते. जुना मुठा कालवा 160 वर्षे जुना आहे, तर नवीन मुठा उजवा कालवा 60 वर्षे जुना आहे. या कालव्यांचे नूतनीकरण आणि अस्तरीकरण करणे गरजेचे असून, त्या कामांची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे.

त्यानुसार जुना मुठा उजवा कालवा आणि नवीन मुठा उजवा कालवा आणि त्यावरील वितरण प्रणाली आणि बंधार्‍यांची दुरुस्ती कामांपैकी एका कामाचे अंदाजपत्रक प्रदेश कार्यालयाला सादर करण्यात आले आहे. उर्वरित कामांची अंदाजपत्रके तयार करण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे. या कामांना मान्यता घेऊन निधी उपलब्धतेनुसार कामे प्रस्तावित आहेत, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार राहुल कुल यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news