नाशिक : शहरात अनधिकृत नळकनेक्शनमधून सर्रास पाणीचोरी, मनपाची शोधमोहीम कागदावरच | पुढारी

नाशिक : शहरात अनधिकृत नळकनेक्शनमधून सर्रास पाणीचोरी, मनपाची शोधमोहीम कागदावरच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

एकीकडे नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या करदात्यांवर दरवाढ लागू करण्याची तयारी करणाऱ्या महापालिकेने दुसरीकडे अनधिकृत नळजोडणीच्या माध्यमातून सर्रास पाणीचोरी करणाऱ्यांना जणू काही अभयच दिले आहे. महापालिका स्थापनेपासून गेल्या ४० वर्षांत नाशिक शहराच्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी धरणातून चार पटीने पाणी उचलत आहे. तुलनेत नळकनेक्शनधारकांची संख्या मात्र वाढू शकली नसल्याने, दररोज कोट्यवधी रुपयांची शहरात पाणीचोरी होत असल्याचे समोर येत आहे. मात्र, अशातही महापालिकेची शोधमोहीम कागदावरच असल्याने, नियमित करदात्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

सद्यस्थितीत नाशिक शहराची लोकसंख्या सुमारे २० लाखांवर पोहोचली आहे. नाशिक शहराला सुरुवातीला गंगापूर धरण समूह तसेच दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जात होता. शहराच्या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी थेट पाइपलाइन योजनेद्वारे मुकणे धरणातूनही पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. स्थापनेपासून आतापर्यंत धरणांतील पाणीआरक्षणात कित्येक पट वाढ करण्यात आली आहे. शहराच्या विस्ताराचा वेग लक्षात घेता पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात येणाऱ्या नळकनेक्शनधारकांच्या संख्येतही वाढ होणे अपेक्षित होते. परंतु महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सदरी सद्यस्थितीत केवळ दोन लाख ३ हजार ८६ नळकनेक्शनधारकांचीच नोंद आहे. महापालिकेच्या घरपट्टी सदरी सुमारे सव्वाचार लाख मिळकतींची संख्या असताना नळकनेक्शनधारकांची संख्या मात्र निम्मीच असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळकनेक्शन असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महापालिकेच्या माध्यमातून धरणातून उचलण्यात येणाऱ्या एकूण पाण्याच्या तुलनेत जेमतेम ६० टक्केच पाण्याचा हिशेब लागत असून, ४० टक्के पाणीगळती होत असल्याचे महापालिकेने यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. या पाणीचोरीला वितरण वाहिन्यांतील दोष जबाबदार आहेच पण त्याचबरोबर अनधिकृत नळकनेक्शनधारकही त्यास कारणीभूत असल्याचे दिसत आहे. मात्र, पालिकेच्या पाणीपुरवठा व करवसुली विभागातील अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे या अनधिकृत नळकनेक्शनधारकांचे फावते आहे.

चिरीमिरीसाठी अधिकाऱ्यांकडून नळजोडणी

नळकनेक्शन घेण्यासाठी अधिकृत प्लंबर्सची यादी महापालिकेने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. नवीन नळकनेक्शनसाठी मनपाकडे अर्जाद्वारे विहित शुल्क अदा केल्यानंतरच प्लंबर्समार्फत नळजोडणी केली जाणे आवश्यक असताना अधिकारी, प्लंबर्स चिरीमिरी घेऊन अनधिकृतपणे नळकनेक्शन जोडून देत असल्यामुळे शहरातील पाणीचोरीचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनधिकृत नळजोडणी करणाऱ्या प्लंबर्सवर गुन्हा दाखल करण्याची गरज आहे.

नळकनेक्शनधारकांची संख्या

विभागनहाय आकडेवारी

सातपूर        –                 ३०,३०९

पंचवटी         –                ४२,९८८

सिडको-                        ५५,६५०

नाशिकरोड  –               ३३,३४५

नाशिक पश्चिम –          १०,६०२

नाशिक पूर्व  –                २९

हेही वाचा :

Back to top button