औरंगाबाद : विद्यार्थ्यांची शाळेसाठी अद्यापही पायपीट

औरंगाबाद : विद्यार्थ्यांची शाळेसाठी अद्यापही पायपीट

हतनूर; पुढारी वृत्तसेवा : हतनूर (ता. कन्नड, जि. औरंगाबाद ) येथील जैतापूर चौफुली ते जोशी वस्तीवरील नागरिकांना वीस वर्षांपासून रहदारीसाठी रस्ताच नाही. नुकतेच या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र, पावसाळा सुरू झाला तरी या ठिकाणी अद्याप रस्ताच झाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चिखलातून वाट काढत जावे लागते. नागरिकांना बाहेरगावी जातानाही कसरत करावी लागत आहे.

सरकारच्या वतीने सर्वांना शिक्षण मोहिमेच्या माध्यमातून शाळांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शंभरच्यावर शाळांना आयएसओ नामांकन मिळाले आहे. मात्र, हतनूर जोशी वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेसाठीच्या रस्त्याचा वनवास संपता संपेना. जैतापूरपासून ते जोशी वस्ती हे अंतर एक ते दीड किमी आहे. येथील रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. वस्तीवरील रस्ता पाऊस पडल्यानंतर चिखलमय होतो. विद्यार्थ्यांना अक्षरशः दोन फूट चिखल असलेल्या रस्त्यातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे.

तारेवरची कसरत 

चिखलातून शेतकऱ्यांना वाट काढावी लागत आहे. खरीप हंगाम, जोरदार पाऊस. मात्र, शेताकडे जाणारे तसेच पाणंद रस्त्यावर चिखल साचल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करीत शेतात जावे लागत आहे. विशेष म्हणजे, पाणंद रस्ते दुरुस्तीसाठी अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे. दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे शेताकडे जाणारे रस्ते मोठ्या प्रमाणात चिखलमय झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चिखलातून वाट शोधावी लागत आहे.

दुसरीकडे शेतीसाठी लागणारे साहित्य, खते, साहित्य बैलगाडीत घेऊन जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र शेताकडे जाणारे अनेक मार्ग चिखल आहे. हतनूर परिसरात अन्य ठिकाणी शेती रस्त्यांची हीच अवस्था आहे. काही पाणंद रस्ते, शेताकडे जाणाऱ्या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे; मात्र ते पूर्ण झाले नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे.आता तर जेमतेम पावसाची सुरुवात झाली असून, पूर्ण पावसाळा बाकी आहे. त्यामुळे शेतात कसे जायचे, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news