गोवा : ऑनलाईन फसवणूकप्रकरणी दिल्लीतील युवकाला अटक

गोवा : ऑनलाईन फसवणूकप्रकरणी दिल्लीतील युवकाला अटक

पणजी;  पुढारी वृत्तसेवा :  पणजी शहर पोलिस पथकाने समाज माध्यमातून फसवणूक केलेल्या दिल्ली येथील युवकाला दिल्लीत अटक केली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते.

पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीपाद नाईक (वय 35, रा.मडगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयिताने मोबाईल वरून नाईक याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्याने संपर्क वाढवत त्याचा ईमेल आयडी शेअर करण्यास प्रवृत्त केले. त्याची ओळख जाणून घेण्याच्या बहाण्याने त्याची वैयक्तिक माहिती आणि व बँक माहिती घेतली. त्यानंतर नाईक यांच्या क्रेडिट कार्डवरून 85,767 रुपये स्वत:च्या बँकेत वळवले व फसवणूक केली.

पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नाईक यांना आलेल्या फोनचा तपास केला असता तो दिल्लीतील असल्याचे कळून आले. त्यानंतर योग्य ते नियोजन करून या फसवणूक प्रकरणाचा छडा लावण्याचे ठरवून पणजी पोलिसांचे पथक दिल्लीला पाठवले. या पथकाने आरोपी साहील राज कुमार (वय 31, रा. जहाँगीरपुरी, नवी दिल्ली) याला ताब्यात घेतले. संशयिताने रोहिणी, नवी दिल्ली येथे बँक खाते उघडले आहे. त्या बँक खात्यांचा वापर करून ऑनलाईन फसवणूक करत होता असे तपासात स्पष्ट झाले आहे. संशयिताला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिस उपनिरीक्षक अल्लाउद्दीन खान यांच्या नेतृत्वाखाली हवालदार सुजय पाटील, चालक रामा घाडी यांच्या पथकाने आरोपाला दिल्ली येथे पकडले. पोलिस कॉन्स्टेबल नितीन गावकर व इरमिया बालभद्रा यांनी माहिती विकसित केली. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना, उपअधीक्षक सुदेश नाईक व निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news