पालघर : प्रसूतीच्या कळा सोसत निघालेल्या महिलेची हेळसांड | पुढारी

पालघर : प्रसूतीच्या कळा सोसत निघालेल्या महिलेची हेळसांड

वाडा; मच्छिंद्र आगिवले :  वाडा तालुक्यातील पाचघर गावातील महिलेला प्रसूतीसाठी खासगी जीप मधून रुग्णालयात नेत असताना पक्का मार्ग नसल्याने या महिलेचे अतोनात हाल झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने महिला सुखरूप असून तिच्यावर ठाणे येथे सुखरूप प्रसूती झाली असली तरी पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला भेडसावणार्‍या मूलभूत समस्यांचे हे भयानक वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

तालुक्यातील पाचघर गावातील ज्योती दोडे यांना 16 ऑगस्टला प्रसूतीच्या कळा येऊ लागल्याने आशासेविका तात्काळ गावातील जीप घेऊ न परळी प्राथमिक केंद्रात जाण्यासाठी निघाली. परळी ते खोडाळा या मुख्य रस्त्या पासून हे गाव पाच किमी. अंतरावर असल्यामुळे काही ठिकाणी रस्त्याची अवस्था बिकट आहे. या मातीच्या रस्त्यातून प्रवास करतांना रुग्णालयात निघालेली जीप चिखलात रुतल्यामुळे अथक प्रयत्नाने ग्रामस्थांनी रुतलेली जीप बाहेर काढून महिलेला परळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचवली. परळी आरोग्य केंद्र व वाडा ग्रामीण
रुग्णालय यांनी महिलेला ठाणे येथे उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिल्याने अखेर या महिलेची ठाणे येथे प्रसूती झाली असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

पाचघर गावापासून जवळपास 80 किलोमीटरचा प्रवास करून ठाणे येथे आपल्या प्रसूतीच्या कळा सहन करीत
पोहोचलेल्या महिलेची झालेली ही हेळसांड स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला निश्चितच गालबोट लावणारी आहे.
जव्हार, मोखाडा, वाडा अशा पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे हे विदारक चित्र आजही ग्रामीण भागातील जनता सहन करते हे वास्तव असून आतापर्यंत पाचघर गावातील रस्त्यांवर करोडो रूपयांचा खर्च करण्यात आला असुन याबाबत सखोल चौकशीची मागणी शिवक्रांती संघटनेने केली आहे.

Back to top button