Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ४५३ अंकांनी घसरून बंद, ‘या’ शेअर्समध्ये विक्रीचा दबाव, घसरणीमागे होते ‘हे’ ४ घटक | पुढारी

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ४५३ अंकांनी घसरून बंद, 'या' शेअर्समध्ये विक्रीचा दबाव, घसरणीमागे होते 'हे' ४ घटक

पुढारी ऑनलाईन : जागतिक कमकुवत संकेतांदरम्यान आज शुक्रवारी शेअर बाजार लाल चिन्हात बंद झाला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ६०० अंकांनी घसरून ७२,५०० च्या खाली व्यवहार केला. त्यानंतर सेन्सेक्स ४५३ अंकांच्या घसरणीसह ७२,६४३ वर बंद झाला. तर निफ्टी १२३ अंकांनी घसरून २२,०२३ वर स्थिरावला. या आठवड्यात विक्रीच्या सपाट्यामुळे दोन्ही निर्देशांक सुमारे २ टक्क्यांनी घसरले आहेत आणि बाजारासाठी हा ऑक्टोबर अखेरीनंतरचा सर्वात खराब आठवडा राहिला आहे. (Stock Market Closing Bell)

दरम्यान, टेलिकॉम वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल चिन्हात बंद झाले. ऑईल आणि गॅस ४ टक्क्यांनी घसरला. तर ऑटो, कॅपिटल गुड्स, मेटल आणि पॉवर प्रत्येकी १ ते २ टक्क्यांनी घसरले. मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांकावर आज पुन्हा दबाव राहिला. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.५ टक्क्यांनी घसरला, तर स्मॉलकॅप निर्देशांक सकारात्मक पातळीवर बंद झाला.

सेन्सेक्सवर एम अँड एमचा शेअर्स टॉप लूजर ठरला. त्याचसोबत एचसीएल टेक, टाटा मोटर्स, एलटी, एनटीपीसी, सन फार्मा, इन्फोसिस, ॲक्सिस बँक, एसबीआय हे शेअर्सही घसरले. तर भारती एअरटेल, बजाज फायनान्स, मारुती, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स तेजीत राहिले.

निफ्टीवर एम अँड एम, बीपीसीएल, कोल इंडिया, टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प हे शेअर्स २ ते ५ टक्क्यांदरम्यान घसरले. तर यूपीएल, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, एचडीएफसी लाईफ, अदानी एंटरप्रायजेस हे शेअर्स वाढले.

पेट्रोल, डिझेल दर कपातीनंतर OMC शेअर्स घसरले

पेट्रोल, डिझेल किमतीत २ रुपयांची कपात झाल्याच्या पार्श्वभूमीवर ऑईल मार्केटिंग कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव दिसून आला. काही ऑईल कंपन्यांचे शेअर्स ८ टक्क्यांपर्यंत घसरले. एनएसईवर हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशनचा शेअर्स (Hindustan Petroleum Corporation Share Price) ६ टक्क्यांनी घसरला. तर बीपीसीएलचा शेअर्स ((Bharat Petroleum Corporation Share Price) ५५९ रुपयांपर्यंत आला होता. त्यानंतर त्याने ३ टक्क्ये घसरणीसह ५८८ रुपयांवर स्थिरावला होता. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा शेअर्स (Indian Oil Corporation Share Price) ५ टक्क्यांनी घसरून १६१ रुपयांवर आला.

महागाईचा बाजारावर परिणाम

अपेक्षेपेक्षा जास्त किमतीच्या दबावामुळे अमेरिकेची फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीस विलंब होणार असल्याचे शक्यतेने गुंतवणूकदारांच्या भावना दुखावल्या आहेत. फेब्रुवारीत अमेरिकेत कंझ्युमर प्राइस इंडेक्स (CPI) मध्ये ३.२ टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली. ही बाजाराच्या ३.१ टक्क्यांच्या अपेक्षेपेक्षा किंचित जास्त होती. महागाई कमी होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर यूएस फेड जूनच्या पुढे व्याजदर कपात करण्यास विलंब करेल अशी चिंता व्यक्त केली जात आहे. (Stock Market Closing Bell)

जागतिक बाजाराची काय स्थिती?

आशियाई बाजारात आज घसरण दिसून आली. एमएससीआय एशिया एक्स-जपान निर्देशांक १.१ टक्क्यांनी घसरला. जपानचा प्रमुख निर्देशांक निक्केईदेखील घसरून बंद झाला. अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीचे पडसाद आशियाई बाजारात उमटले आहेत. अमेरिकेतील बाजारातही काल गुरुवारी कमकुवत स्थिती दिसून आली होती.

परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा मूड

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (Foreign portfolio investors) गुरुवारी निव्वळ आधारावर १,३५६ अब्ज रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १३९ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

हे ही वाचा :

 

Back to top button