* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये अनुक्रमे एकूण 115.15 अंक तसेच 313.24 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 22493.55 अंक व 74119.39 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 0.51 टक्क्यांची, तर सेन्सेक्समध्येही वाढ झाली. दोन्ही निर्देशांक आपल्या सर्वकालीन सर्वोच्च पातळीवर (All Time High) बंद झाले. सर्वाधिक वाढ होणार्या समभागामध्ये बजाज ऑटो (12.3 टक्के), टाटा स्टील (11.6 टक्के), टाटा मोटर्स (9.4 टक्के), एचडीएफसी लाईफ (6.9 टक्के) यांचा समावेश होतो. तसेच सप्ताहादरम्यान सर्वाधिक घट दर्शवणार्या कंपन्यांमध्ये इन्फोसिस (-3.4 टक्के), एलटीआय माईंड ट्री (-3.4 टक्के), एसबीआय लाईफ (-2.7 टक्के), अल्ट्राटेक सिमेंट (-2.2 टक्के), महिंद्रा अँड महिंद्रा (-1.8 टक्के) या समभागांचा समावेश होतो. फेडरल रिझर्व्ह या अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून जून महिन्यात व्याजदर कपात होण्याची शक्यता आहे. यामुळे मागील दीड ते दोन वर्षांपासून सुरू असणारे महागाई दरवाढ आणि पर्यायाने व्याज दरवाढ चक्र संपुष्टात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय आणि प्रामुख्याने भारतीय बाजारात तेजीचे वातावरण आहे. याचप्रमाणे विविध जागतिक वित्तीय संस्था जसे की जेपी मॉर्गन, ब्लूम वर्ग यांनी भारतीय रोख्यांचा समावेश त्यांच्या इमर्जिर्ंग मार्केट इंडेक्समध्ये करण्याचा निर्णय घेतला. यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय चलन गंगाजळीत (Forex kitty) मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे. या सर्वांचा एकत्रित सकारात्मक परिणाम भारतीय भांडवल बाजारावर झाला.
* बाजारात रोखे नोंदणीकृत करताना व्यापारी बँका तसेच इतर वित्त संस्था रोखे आणणार्या कंपनीला गुंतवणूकदार शोधून देणे तसेच यासाठी कर्जपुरवठा करणे आणि नोंदणीपश्चात नफ्याची खात्री देणे (Profitable exit offer listing) यासारख्या नियमबाह्य गोष्टी करत असल्याचे रिझर्व्ह बँक तसेच सेबीला आढळले आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये पब्लिक इश्यूच्या माध्यमातून 20 हजार कोटींचा निधी उभारण्यात आला आहे. यासंबंधी जेएम फायनाश्अिल या कंपनीवर कारवाई केल्यानंतर इतर प्रकरणांमध्येदेखील सेबी आणि रिझर्व्ह बँकेने सखोल तपास सुरू केला आहे.
* रिझर्व्ह बँकेचा आयआयएफएल कंपनीला झटका. पुढील आदेश येईपर्यंत सोनेतारण कर्ज (Gold Loan) वाटप करण्यास बंदी. कर्ज वाटपासंबंधीचे नियम न पाळल्याने कारवाई केल्याचे रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण. 31 डिसेंबर अखेरच्या आकडेवारीनुसार आयआयएफएल (फायनान्सची) पोर्टफोलिओ (मूल्य) 24692 कोटींचा आहे. सोनेतारण कर्जवाटप करणारी ही देशाची सगळ्यात मोठी दुसर्या क्रमांकाची कंपनी आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधाची बातमी येताच आयआयएफएलचे समभाग दोन सत्रांत 35 टक्क्यांनी कोसळले. परंतु, कॅनडाचे अब्जपती प्रेम वत्स यांच्या फेअरफॅक्स इंडिया होल्डीम्स कंपनीने 200 दशलक्ष डॉलर्सचा निधी गुंतवण्याच्या तयारीने समभाग पुन्हा सावरले.
* इंडिगो एअरलाईन्समधील प्रमुख गुंतवणूकदार राकेश गंगावाल 3.3 टक्के हिस्सा 3700 कोटींना विकणार. राकेश गंगावाल इंडिगोच्या इंटरग्लोब एव्हिएशनमधील एकूण 25 टक्के हिस्सा. यावेळी ऑफर फॉर सेलची किंमत 2925 रुपये ठरविण्यात आल्याचे समजते. फेब्रुवारी 2022 मध्ये गंगावाल इंटरग्लोब एव्हिएशनच्या संचालक मंडळातून बाहेर पडली. यानंतर पुढील पाच वर्षांत इंटरग्लोब एव्हिएशनमधील त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा संपूर्ण 25 टक्के हिस्सा टप्प्याटप्प्याने विकण्याचे त्यांनी जाहीर केले होते. याच योजनेचा एक भाग म्हणून सध्या ही विक्री करण्यात येत आहे.
* गतसप्ताहात गुरुवारच्या सत्रात सिंगापूर टेलिकम्युनिकेशन्सने (सिंग टेल) भारती एअरटेलमधील 0.8 टक्के हिस्सा विकला. अमेरिकेच्या जीक्यूजी पार्टनर्स कंपनीला एकूण 5850 कोटींना हिस्सा विक्री करण्यात आला. या व्यवहारापश्चात सिंगटेलचा एअरटेलमध्ये एकूण 33 अब्ज डॉलर्सचा (2 लाख कोटींचा) 29 टक्के हिस्सा राहणार आहे.
* मदरसन सुमी कंपनीमधील 4.4 टक्के हिस्सा जपानची कंपनी सुमिटोमो वायरिंगने 3633 कोटींना विकला. 121.03 ते 121.25 रुपये प्रतिसमभाग दरावर एकूण 300 दशलक्ष समभागांची विक्री करण्यात आली. यामुळे सुमिटोमो वायरिंगचा मदरसन सुमी या कंपनीमधील हिस्सा 9.72 टक्क्यांवर खाली आला.
* आंतरराष्ट्रीय पातळीवरील ब्लूमवर्ग इंडेक्स सर्व्हिसेसने भारत सरकारच्या रोख्यांना (G-sec) इमर्जिंग मार्केट लोकल करन्सी इंडेक्स या निर्देशांकामध्ये स्थान देण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे भारतात आणखी 5 ते 7 अब्ज डॉलर्स विदेशी चलन गुंतवणूक येण्याची शक्यता निर्माण झाली. भारतीय चलन रुपयामध्ये ही गुंतवणूक सुमारे 50 ते 60 हजार कोटींच्या घरात असेल. 31 जानेवारी 2025 नंतर पुढील 10 महिन्यांत टप्प्याटप्प्याने हे रोखे समाविष्ट होणार. नुकतेच जूनपासून जेपी मॉर्गन या आंतरराष्ट्रीय कंपनीने भारतीय रोखे इमर्जिंग इंडेक्स फंडमध्ये समाविष्ट करणार असल्याचे जाहीर केले. काही महिन्यांतच ब्लूमबर्गनेदेखील भारतीय रोख्यांना स्थान देण्याचा निर्णय जाहीर केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढणारा दबदबा यातून दिसून येत आहे.
* गुगल प्ले स्टोअरवरून अनेक प्रमुख भारतीय अॅप्स हटवण्यात आले होते. संपर्क आणि आयटी मंत्रालयाचे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मध्यस्थीनंतर हे अॅप्स पुन्हा कार्यान्वित करण्यात आले. यामध्ये इन्फोएज, शादी डॉट कॉम, भारत मॅट्रीमनी, कुकूएफएम यासारखे नामवंत भारतीय अॅप्स होते. अॅप्सना गुगलला द्याव्या लागणार्या मानधनावरून दोन्ही बाजूंमध्ये विवाद होता.
* जेएम फायनान्शिअल कंपनीला रिझर्व्ह बँकेने दणका दिल्यावर आता भांडवल बाजार नियामक सेबीने कडक कारवाई केली. यामुळे पुढील निर्णय येईपर्यंत जेएम फायनान्शिअल कोणत्याही पब्लिक डेट इश्यूसाठी लीड मॅनेजर म्हणून काम करू शकणार नाही. परंतु, सध्या तरी असलेल्या डेट इश्युसाठी पुढील 60 दिवसांपर्यंत लीड मॅनेजर म्हणून काम करण्याची सवलतदेखील देण्यात आली आहे. आयपीओ किंक एनसीडी बाजारामध्ये आणताना लीड मॅनेजरच्या माध्यमातून आणले जातात. अशावेळी यासाठी वैयक्तिक गुंतवणूकदार मिळवून देणे, त्यांना निधी उपलब्ध करून देणे तसेच नोंदणीकृत होताच (Listing) नफ्यासह बाहेर पडण्याची हमी देणे यासारखे नियमबाह्य वर्तन केल्याचा जेएम फायनान्शिअलवर आक्षेप आहे. यासंबंधीचा तपास पुढील सहा महिन्यांत केला जाईल. तसेच या सर्व प्रक्रियेत तपास संस्थांना पूर्ण मदतीचे आश्वासन जेएम फायनान्शिअलकडून देण्यात आले आहे.
* एसआयपीमार्फत भारतीय भांडवल बाजारात होणार्या गुंतवणुकीने फेब्रुवारीमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला. फेब्रुवारी महिन्यात एसआयपीच्या माध्यमातून 19187 कोटींची गुंतवणूक झाली. एसआयपीच्या माध्यमातून मागील 17 महिन्यांपैकी सलग 14 महिन्यांत गुंतवणुकीत वाढ झाल्याचे पाहावयास मिळते.
* सोने आणि चांदीच्या किमती विक्रमी पातळीवर शुक्रवारच्या सत्रात एमसीएक्स स्टॉक एक्स्चेंजवर सोन्याचा भाव 10 ग्रॅमचा भाव 65,298 रुपयांवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात हा भाव 2,152 डॉलरवर पोहोचला. चांदीच्या दरांनीदेखील प्रतिकिलो 74 हजारांचा टप्पा गाठला. जून महिन्यात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याज दर कपात करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे जागतिक बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाल्याचे अर्थ विश्लेषकांचे मत.
* सरकारी बँकांच्या कर्मचार्यांच्या पगारात 17 टक्क्यांची वाढ. यासाठी एकूण 12,449 कोटींचा निधी खर्च केला जाणार. 1 नोव्हेंबर 2022 पासून पूर्वलक्षी प्रभावाने ही वाढ लागू केली जाणार. यामुळे कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण.
* 1 मार्च रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी मागील 2 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर म्हणजे 625.6 अब्ज डॉलर्स झाली. केवळ एका आठवड्यात गंगाजळीत 6.6 अब्ज डॉलर्सची वाढ झाली.