Stock Market T+0 Settlement | शेअर मार्केटमध्ये २८ मार्चपर्यंत T+0 ट्रेड सेटलमेंट सुरु होणार, गुंतवणूकदारांना कसा होईल फायदा? | पुढारी

Stock Market T+0 Settlement | शेअर मार्केटमध्ये २८ मार्चपर्यंत T+0 ट्रेड सेटलमेंट सुरु होणार, गुंतवणूकदारांना कसा होईल फायदा?

पुढारी ऑनलाईन : सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) २८ मार्चपर्यंत पर्यायी आधारावर T+0 ट्रेड सेटलमेंट प्रणाली सुरू करेल, असे ‘सेबी’च्या अध्यक्षा माधबी पुरी बूच यांनी सोमवारी सांगितले. AMFI इव्हेंटदरम्यान त्यांनी ही माहिती दिली आहे.

सध्या भारतीय शेअर बाजारातील व्यवहार T+1 सेटलमेंट सायकलवर चालतात. T+0 चा अर्थ असा की त्याच दिवशी सेटलमेंट होईल आणि इन्स्टंट सेटलमेंट हे सुनिश्चित करेल की व्यवहार लगेच सेटल केले जातील. म्हणजेच शेअर्स विकताच लगेच अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. (Stock Market T+0 Settlement)

सेबीने सेम-डे-सेटलमेंट (T+0) चा दोन टप्प्यांत अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव दिला होता. यावर सेबीने सार्वजनिक सूचनादेखील मागविल्या होत्या. सध्याच्या T+1 चक्राव्यतिरिक्त ही छोटी सेटलमेंट सायकल असेल. हा नवा नियम आल्यानंतर गुंतवणूकदारांना अधिक फायदा होईल. जेव्हा ते शेअर्स खरेदी करतील तेव्हा त्याच दिवशी ते डिमॅट अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होतील. तसेच शेअर विकल्यानंतर त्याच दिवशी अथ‍वा तत्त्काळ अकाउंटमध्ये पैसे जमा होतील.

पहिल्या टप्प्यात पर्यायी T+0 सेटलमेंट सायकल (दुपारी १:३० वाजेपर्यंत) निधी आणि सिक्युरिटीजच्या सेटलमेंटसह त्याच दिवशी संध्याकाळी ४:३० वाजेपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे.

दुसऱ्या टप्प्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत केलेल्या सर्व व्यवहारांसाठी पर्यायी तत्काळ ट्रेड- बाय-ट्रेड सेटलमेंट (निधी आणि सिक्युरिटीज) केले जाऊ शकते. म्हणजेच दुपारी ३.३० वाजेपर्यंत केलेल्या सर्व व्यवहारांसाठी हा पर्याय असेल.

कसा होईल गुंतवणूकदारांना फायदा?

सेबी प्रमुख म्हणाल्या होत्या की पहिल्या टप्प्यात पर्यायी T+0 सेटलमेंट चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस लागू केले जाईल. इन्स्टंट सेटलमेंट प्रणाली लागू करण्याचा एक मोठा फायदा म्हणजे बाजारात तरलता वाढवणे हा आहे. तसेच निधी थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याने ते गुंतवणूकदारांचे संरक्षण मजबूत करेल.

सेटलमेंट सायकल २००२ मध्ये T+5 वरून T+3 आणि त्यानंतर २००३ मध्ये T+2 पर्यंत आणण्यात आले. पुढे २०२१ मध्ये T+1 सेटलमेंट टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले. जे जानेवारी २०२३ पासून पूर्णपणे लागू करण्यात आले.

सेबीच्या कन्सल्टेशन पेपरनुसार, सुरुवातीला बाजार भांडवलावर आधारित टॉप ५०० सूचीबद्ध कंपन्यांमध्ये T+0 सेटलमेंट प्रणाली उपलब्ध करून दिली जाईल. हे २००, २००, १०० च्या तीन टप्प्यांत सर्वात कमी ते सर्वाधिक बाजार भांडवल असलेल्यांमध्ये केले जाईल. (Stock Market T+0 Settlement)

दरम्यान, एका दिवसाच्या शॉर्ट सेटलमेंट सायकलवर काम करणारा भारत हा चीननंतरचा दुसरा देश बनणार आहे. इतर मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये ट्रेड सेटलमेंट सामान्यतः दोन दिवसांत पूर्ण होते.

हे ही वाचा :

 

 

Back to top button