कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील कोरोना रुग्णांचे मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण कोल्हापूर जिल्ह्यात आहे. त्यातच तिसर्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक गुरुवारी(दि. 15) कोल्हापुरात येत आहे. कोल्हापूरचा संसर्ग दरही राज्यात सर्वाधिक आहे. याची गंभीर दखल आता केंद्र सरकारने घेतली आहे. त्यामुळेच पाहणीसाठी येणार्या या केंद्रीय पथकामुळे प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.
जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील सर्व संबंधित अधिकारी यांच्याशी हे पथक चर्चा करणार आहे.
केंद्रीय पथकाने कोल्हापूरच्या वाढत्या संसर्गाची आणि मृत्यूची दखल घेतल्यामुळे त्याबाबतची माहिती संकलित करण्यासाठी बुधवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका व आरोग्य विभागात याची तयारी केली जात होती.
केंद्रीय पथकाने सकाळी 11 वाजता सर्व संबंधितांना चर्चेसाठी पाचारण केले आहे. या अधिकार्यांना घरोघरी जाऊन करण्यात येणारे सर्वेक्षण,काँटॅक्ट ट्रेसिंग, ऑक्सिजन पुरवठा, आयसीयु बेडची स्थिती, व्हेंटिलेटर याची माहीती पथकाला द्यावी लागणार आहे. संभाव्य तिसर्या लाटेसाठी काय तयारी केली आहे, केंद्र सरकारकडून कोणत्या प्रकारची मदत अपेक्षित आहे. याची माहितीही यावेळी घेतली जाणार आहे.
बैठकीनंतर दुपारी हे केंद्रीय पथक सीपीआर हॉस्पिटलला भेट देणार आहे. तेथे उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांची पाहणी करणार आहे. कोरोनामुळे ज्यांचा मृत्यु झाला त्याच्या ऑडिटमधून जे निष्कर्ष काढण्यात आले आहेत त्याची संपूर्ण माहितीही हे पथक घेणार आहे.
लसीकरण केंद्रांनाही भेट
सीपीआरमधील पाहणीनंतर हे पथक शहरातील काही लसीकरण केंद्रांना भेट देणार आहे. त्याचबरोबर कसबा बावडा येथील सेवा रुग्णालय आणि काही प्राथमिक आरोग्य केंद्रांना ते भेट देणार आहेत. विशेषत: ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट सर्वाधिक होता त्याच प्रमाणे सर्वाधिक मृत्यू दर असलेल्या ठिकाणी पथक भेट देणार आहे. याशिवाय त्यांना आवश्यक वाटेल अशा कोणत्याही ठिकाणी हे पथक अचानक भेट देऊ शकते.