पुणे मेट्रोचा ‘गोंधळ’! डिस्प्लेवर एकाच वेळी दोन टायमिंग | पुढारी

पुणे मेट्रोचा ‘गोंधळ’! डिस्प्लेवर एकाच वेळी दोन टायमिंग

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना गेले अनेक वर्षे प्रतीक्षा असलेली मेट्रोची सेवा शिवाजीनगर येथील सिव्हिल कोर्टपर्यंत सुरू झालेली आहे. या मेट्रो सेवेस प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे; मात्र शिवाजीनगर येथील स्टेशनवरून पिंपरी-चिंचवडसाठी नियोजित वेळेत सुटणार्‍या गाड्यांच्या वेळा दर्शविणारा डिस्प्ले बघितल्यास मेट्रोचाच गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवड तसेच पुण्यातील नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मेट्रोसेवा सुरू करण्यात आली आहे. पिंपरीतून मोरवाडी ते शिवाजीनगर स्थानक, तर पुण्यातून शिवाजीनगर ते वनाझ तसेच रुबी हॉलपर्यंत मेट्रो धावत आहे. शिवाजीनगर मेट्रो स्थानकात मेट्रो सुटण्याच्या वेळेचा डिस्प्ले बोर्डवरील वेळ बघितल्यास प्रवाशाांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मेट्रोच्या वेळापत्रकामध्ये पिंपरी-चिंचवडसाठी धावणार्‍या पुढील दोन गाड्यांची वेळ दर्शविण्यात येते; मात्र या वेळा दर्शविण्यातही मेट्रोचा गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे.

शहरातील वाहतूककोेंडीतून प्रवाशांची सुटका होण्यासाठी मेट्रोसेवा सुरू झाली आहे. सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत ही मेट्रोसेवा सुरू असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची तसेच बाहेर गावाहून शहरात येणार्‍या प्रवाशांचीही मोठी सोय झाली आहे. मात्र स्थानकावरून सुटणार्‍या गाड्यांचे वेळापत्रकातील गोंधळ बघितल्यानंतर प्रवाशांनी करायचे काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

शिवाजीनगर मेट्रोस्थानकात गुरुवार (दि. 17 ) दुपारी 1 वाजून 31 मिनिटे गाड्यांचे वेळापत्रक दर्शविणार्‍या डिस्प्लेवर दोन वेगवेगळ्या वेळा दिसून येत आहेत. दर दहा मिनिटानंतर मेट्रो धावते; मात्र डिस्प्लेवर दर्शविलेली वेळ चुकीची दाखविली जात असल्याने आमचाही गोंधळ उडत असल्याचे प्रवाशांकडून सांगितले जात आहे. मेट्रोच्या या कारभारामुळे प्रवाशांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

स्थानकातून सुटणार्‍या गाड्यांबाबतची योग्य वेळ दाखविली जावी, अशी मागणी प्रवाशांतून केली जात आहे. दर दहा मिनिटांनी मेट्रो सेवा असल्यामुळे मेट्रो प्रशासनानेही प्रवाशांना गाड्यांची माहिती देणारी यंत्रणा अद्ययावत ठेवणे गरजेचे असल्याचेही प्रवाशांचे म्हणणे आहे.
या संदर्भात मेट्रोच्या अधिकार्‍यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, मेट्रो वेळेत धावत आहेत; तसेच प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही, याबाबत आम्ही योग्य ती दक्षता घेत आहोत.

प्रवाशांत संभ्रम

मेट्रोच्या शिवाजीनगर स्थानकात गुरुवार (दि. 17) दुपारी 1 वाजून 31 मिनिटांनी डिस्प्ले बोर्डवर दर्शविण्यात आलेली माहिती ही प्रवाशांना संभ्रमित करणारी होती. या बोर्डवरील वेळही काही सेकंदातच बदलून ती 1 वाजून 33 मिनिटे दर्शवित होती. पिंपरी-चिंचवडकडे जाणारी पुढील गाडी दोन मिनिटांत येईल, असे दर्शवत असूनही गाडी त्यानंतर सुमारे दहा मिनिटांनी स्थानकात आली.

नव्याने मेट्रो सुरू असून आम्ही मैत्रिणी कॉलेजनिमित्त मेट्रोने प्रवास करण्यासाठी प्राधान्य देतो. मात्र, वेळापत्रकनुसार मेट्रो धावत नसल्याने आम्हाला अधिकवेळ स्थानकांत थांबावे लागते

– प्रिया दळवी, विद्यार्थिनी

मी कामाला शिवाजीनगर येथे असल्यामुळे सध्या मेट्रोने प्रवास करतो. मला वेळेत कामावर पोहोचणे अपेक्षित आहे; मात्र अनेकवेळा मेट्रो उशिरा येते; तसेच शिवाजीनगर येथील स्थानकात मेट्रो सुटण्याच्या वेळा चुकीच्या दर्शविल्या जातात, त्यामुळे संभ्रम होतो. वेळापत्रक हे बिघडलेले असल्याने मेट्रोची वाट पहावी लागते.

– दीपक भिसे, नोकरदार

हेही वाचा

पिंपरी : नागपंचमीनिमित्त बाजारपेठ सजली

पत्नीच्या साडीने केला शेजाऱ्याचा घात; पतीने झाडली गोळी

खडकेवाके ग्रामपंचायतीस ‘आयएसओ’ मानांकन

Back to top button