निमोणे : गुन्हेगारांना धडकी भरेल अशी कारवाई करणार | पुढारी

निमोणे : गुन्हेगारांना धडकी भरेल अशी कारवाई करणार

निमोणे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगारांच्या कुंडल्या पोलिस दलाने गोळा केल्या आहेत. या सराईत गुन्हेगारांची पाठराखण करणार्‍या तथाकथित ‘व्हाईट कॉलर’ मंडळींनाही या पुढील काळात आम्ही पोलिस ‘रेकॉर्ड’वर घेऊन कायदा काय असतो याची जाणीव करून देऊ, गुन्हेगारी कायमची उखडून टाकण्यासाठी पोलिस ‘रेकॉर्ड’वरील गुन्हेगारी टोळ्यांना ’मोक्का’ आणि एमपीडी कायद्यांतर्गत स्थानबद्ध करणारच, असा स्पष्ट इशारा शिरूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय जगताप यांनी दिला. निमोणे (ता. शिरूर) येथे गावभेटीसाठी जगताप आले असता त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

फेब्रुवारी महिन्यात निमोणे येथे मनोहर शितोळे (वय 72) यांचा खून करून विवस्त्र अवस्थेत मृतदेह एका उसाच्या शेतात टाकलेला आढळून आला होता. पाच- सहा महिने लोटले तरी अद्यापही खुनी सापडलेला नाही. पोलिस निरीक्षक जगताप यांनी गावात येऊन या गुन्ह्याची पुन्हा एकदा माहिती घेतली. मृतदेह सापडलेल्या जागेला भेट देऊन स्थानिक तपास पथकाला सूचना दिल्या व कोणत्याही परिस्थितीत या गुन्ह्याचा तपास निर्धारित वेळेत मार्गी लावण्यास सांगितले. आजपर्यंत जो तपास झाला त्यामध्ये नक्की काहीतरी पोलिसांच्या नजरेतून राहिले आहे ते शोधू, मग आरोपी गजाआड दिसेल अशा सूचना केल्या.

दरम्यान, पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे करणार्‍या सराईत गुन्हेगारांवर तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्याची कारवाई सुरू असून, थोड्याच दिवसांत नशेचा बाजार करणार्‍या गुन्हेगारांवर जबर कारवाई करू, अशी ग्वाहीही पोलिस निरीक्षक जगताप यांनी दिली.
या वेळी पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलिस अंमलदार राजेन्द्र गोपाळे, जमादार कोथळकर, पोलिस पाटील इंदिरा जाधव, माजी सरपंच विजय भोस, विलास ढोरजकर, संदीप गव्हाणे, संदीप ताठे, प्रताप थोरात, नाना काळे, दिलीप काळे, दत्ता जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा

आंबेगाव तालुक्यात 82 टक्के क्षेत्रावर पेरण्या

निरा डावा कालव्यावरील पुलाचे काम रखडले

पुरंदरच्या पश्चिम भागातील वाटाणा पीक जोमात

Back to top button