आंबेगाव तालुक्यात 82 टक्के क्षेत्रावर पेरण्या | पुढारी

आंबेगाव तालुक्यात 82 टक्के क्षेत्रावर पेरण्या

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यात खरीप हंगामात 82 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. 18 टक्के क्षेत्रामध्ये पावसाअभावी अजूनही पेरणी होणे बाकी असल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयातून देण्यात आली. सध्या पावसाने दडी मारल्याने मोठ्या प्रमाणावर पेरणीची कामे खोळंबली आहेत. आंबेगाव तालुक्यात दरवर्षी खरीप हंगामात 100 टक्के क्षेत्रावर पेरणी होत असते. परंतु या वर्षी जुलै महिना अर्धा संपत आला, परंतु पावसाअभावी 82 टक्के एवढ्याच क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

तसेच पेरणी झालेल्या क्षेत्रावरही दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे एकंदरीतच या वर्षीची पावसाची परिस्थिती पाहता आणि झालेल्या पेरण्या पाहता तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. डिंभे धरणामुळे (हुतात्मा बाबू गेनू सागर) तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर क्षेत्र ओलिताखाली आले असून, येथे बारमाही पिके घेतली जातात. पावसावर सातगाव पठार, लोणी धामणी परिसरासह अनेक गावांमध्ये खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली जाते. त्याचप्रमाणे पश्चिम आदिवासी भागात पावसावर भाताची लावणी सुरू आहे. तालुक्याच्या पूर्व भागात अजूनही पावसाचा पत्ता नसल्याने येथील शेतकर्‍यांची पेरणीची कामे खोळंबली आहेत.

हेही वाचा

राशीन नळयोजनेच्या पाण्याची चोरी

50 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत होते मोठ्या सुळ्यांचे बिबटे

वाळकी : खून, खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस केले जेरबंद

Back to top button