निरा डावा कालव्यावरील पुलाचे काम रखडले | पुढारी

निरा डावा कालव्यावरील पुलाचे काम रखडले

सोमेश्वरनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : वाणेवाडी (ता. बारामती) येथील निरा डावा कालव्यावरील सुरू असलेले पुलाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थ आणि प्रवाशांनी केली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून या पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. एकेरी वाहतूक सुरू असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. अपघात झाल्यानंतरच ठेकेदार आणि प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

वाणेवाडी येथील निरा डावा कालव्यावर नव्याने पूल बांधण्यात येत आहे. नाबार्डमधून यासाठी जवळपास सव्वाकोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, पुलाचे काम कासवगतीने सुरू आहे. या रस्त्यावरून मुरुम गाव आणि वाणेवाडीतील प्रवाशी ये-जा करतात. याशिवाय परिसरातून सोमेश्वर विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी, काकडे महाविद्यालय याठिकाणी येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. विद्यार्थ्यांना या ठिकाणाहून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

जड वाहतुकीसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. जवळच सोमेश्वर कारखाना असल्याने आणि सातारा आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा हा मार्ग असल्याने पुलाचे काम लवकर व्हावे ही अपेक्षा आहे. दोन्हीही बाजूंकडून वाहन आल्यास वाहनांच्या रांगा लागतात. सध्या पावसाळा सुरू आहे, त्यामुळे वाहने घसरण्याचा धोका वाढतो आहे. पुलाचे काम तातडीने पूर्ण करून तो वाहतुकीसाठी सुरू करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

संबंधित बातम्या

हेही वाचा

आंबेगाव तालुक्यात 82 टक्के क्षेत्रावर पेरण्या

पुरंदरच्या पश्चिम भागातील वाटाणा पीक जोमात

50 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत होते मोठ्या सुळ्यांचे बिबटे

Back to top button