पुरंदरच्या पश्चिम भागातील वाटाणा पीक जोमात | पुढारी

पुरंदरच्या पश्चिम भागातील वाटाणा पीक जोमात

सासवड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागात खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेला वाटाणा सध्या जोमदार आला आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असूनदेखील बहुतांश शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने वाटाण्याचे पीक घेतले आहे. यंदा वाटाण्याचे मोठे उत्पादन मिळून बाजारभावदेखील चांगला मिळेल, असा अंदाज उत्पादक शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे. बाजारात ग्राहकांची पहिली पसंद असलेला आणि सर्वाधिक मागणी म्हणून पुरंदरचा वाटाणा ओळखला जातो.

म्हणूनच शेतकरी किंवा व्यापार्‍यांनी विक्रीसाठी पुरंदरचा वाटाणा म्हटले की ग्राहक कोणत्याही किंमतीत खरेदी करण्यासाठी तयार असतात. पुरंदर तालुक्यात एकाच हंगामात दोन ते तीन महिन्यांत दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते. तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील चांबळी, गराडे, भिवरी, कोडीत, भिवडी व सुपे परिसरात एम.पी.थ—ी. व गोल्डन जातीचा वाटाणा घेतला जातो.

यंदा पाऊस कमी असूनदेखील बहुतांश शेतकर्‍यांनी वाटाण्याची पेरणी केली आहे. जवळपास 1 हजार 300 हेक्टर क्षेत्रावर वाटाणा पिकाची पेरणी झाली आहे. इतर जलस्रोतांच्या आधाराने पिकाची चांगली उगवण झाली आहे. सध्या पीक जोमदार दिसून येत आहे. वाटाणा परिपक्व होण्यास अजून मोठा काळ बाकी आहे. मात्र, आताच बाजारात वाटाणा खरेदी करणारे व्यापारी सक्रिय झाले आहेत. खरीप हंगामात वाटाणा पिकाच्या खरेदी-विक्रीतून मोठी उलाढाल होत असते. वाटाणा हे केवळ दीड ते दोन महिन्यांत लाखोंचे उत्पन्न देणारे पीक आहे, असे चिंबळी येथील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय शेंडकर यांनी सांगितले.

पुरंदर तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. तरीदेखील जवळपास 1 हजार 300 हेक्टर क्षेत्रावर वाटाणा पिकाची पेरणी झाली आहे. सध्या पिकाची वाढदेखील उत्तम झाली आहे. यंदा वाटाणा पीक पुरंदरच्या अर्थकारणात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

सुरज जाधव, कृषी अधिकारी, पुरंदर.

हेही वाचा

कोल्हापूर : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षनिष्ठा दाखवून द्या : राजीव आवळे

आंबेगाव तालुक्यात 82 टक्के क्षेत्रावर पेरण्या

50 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत होते मोठ्या सुळ्यांचे बिबटे

Back to top button