कोल्हापूरच्या शाही दसर्‍याची शान ; वैशिष्ट्यपूर्ण ‘मेबॅक’ @ ८५ - पुढारी

कोल्हापूरच्या शाही दसर्‍याची शान ; वैशिष्ट्यपूर्ण ‘मेबॅक’ @ ८५

कोल्हापूर ; सागर यादव : करवीर नगरीच्या ऐतिहासिक दसर्‍याची शान असणारी मेबॅक कार यंदा 85 व्या वर्षात पदार्पण करत आहे. जगप्रसिद्ध असणार्‍या कोल्हापूच्या शाही दसर्‍यात ही ‘मेबॅक’ कार लोकांच्या आकर्षणाचा विषय असतो. नवरात्रौत्सवांतर्गत विजयादशमीला होणार्‍या सीमोल्लंघनासाठी छत्रपती घराण्यातील सदस्यांचे (हुजूर स्वार्‍या) या मेबॅकमधूनच ऐतिहासिक दसरा चौकात आगमन होते.
जर्मनीचा हुकूमशहा व लढवय्या सेनानी अ‍ॅडॉल्फ हिटलर अशीच ‘मेबॅक’ गाडी वापरायचा, यामुळे या गाडीला ‘हिटलर रोल्स’ म्हणूनही ओळखले जाते. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात मेबॅकचे उत्पादन बंद पडले. यामुळे जगभरात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच मेबॅक कार शिल्लक आहेत. यापैकी एक ‘आपल्या कोल्हापुरात’ असल्याचा सर्वांना अभिमान आहे.

काळानुरूप दसरा सोहळ्यातही मोठे बदल झाले. पूर्वीच्या दसरा मिरवणुकीतील हत्ती-घोडे-उंट या लवाजम्यातील वाहनांची जागा स्वयंचलित वाहनांनी घेतली. यामुळे राजर्षी शाहूंच्या काळातील हत्तीच्या रथाची जागा छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात मेबॅक कारने घेतली. यामुळे ही मेबॅक कार आजही कोल्हापूरच्या शाही दसर्‍यांचे प्रमुख आकर्षण आहे.

छत्रपतींचा सन्मान…

छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळातील मेबॅक कारचे जतन पुढे छत्रपती शहाजी महाराज यांनी केले. त्यांच्यानंतर सध्या या गाडीचे संवर्धन व संरक्षणाचे काम विद्यमान शाहू महाराज, संभाजीराजे, मालोजीराजे व छत्रपती घराण्यातील सदस्य करत आहेत. कोल्हापुरातील मेबॅक गाडीला मिळालेला मान पाहून उत्पादक कंपनीने काही वर्षांपूर्वी जर्मनी येथे शाहू महाराज यांचा विशेष सन्मान करून कोल्हापुरातील मेबॅकची नोंद कंपनीच्या वाटचालीच्या इतिहासात घेतली आहे.

मेबॅक कारची वैशिष्ट्ये…

छत्रपती राजाराम महाराज यांनी इसवी सन 1936 च्या सुमारास इंग्लंड येथील ‘रोल्स राईस’ या कंपनीला मेबॅक गाडी बनविण्याची ऑर्डर दिली. कोल्हापूर (करवीर) संस्थानच्या ध्वजाचा रंग (सॅफरॉन), छत्रपतींचा शिक्का (मोर्तब), शिवछत्रपतींना तलवार देणारी भवानी अशी वैशिष्ट्ये मेबॅकवर एकवटली आहेत. गाडीचा मूळ क्रमांक (बीवायएफ 8776) हा असा होता.

मात्र, कोल्हापुरात आणल्यानंतर या गाडीचा क्रमांक ‘कोल्हापूर 1’ असा करण्यात आला. मेबॅक 17 फूट लांब 6 फूट रुंद असून यात 6 लोक ऐसपैस बसू शकतात. हाताच्या बोटाने ऑपरेट करता येणारी गिअर सिस्टीम, 200 लिटर क्षमतेचा पेट्रोल टँक, रेल्वेच्या शिटीसारखा पण कर्णकर्कश नसणारा हॉर्न, उन्हाचा त्रास न होणार्‍या टिंटेड ग्लासच्या काचा अशा छोट्या-छोट्या वैशिष्ट्यांनी मेबॅक परिपूर्ण बनविण्यात आली आहे.

Back to top button