तिरुपती देवस्थान कडून अंबाबाईस शालू अर्पण; ‘चामुंडा मातृका’ रुपात पूजा | पुढारी

तिरुपती देवस्थान कडून अंबाबाईस शालू अर्पण; ‘चामुंडा मातृका’ रुपात पूजा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : नवरात्रौत्सवानिमित्त गुरुवारी तिरुपती देवस्थान ट्रस्टकडून प्रतिवर्षीप्रमाणे करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीस शालू अर्पण करण्यात आला. 1 लाख 7 हजार 730 रुपये किमतीचा गुलाबी रंग व सोनेरी काठा-पदराचा शालू असून तो अर्पण करण्यापूर्वी देवस्थान कार्यालय ते मंदिराच्या गाभार्‍यापर्यंत या शालूची मिरवणूक काढण्यात आली.

तिरुमाला देवस्थान समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. रमेश बाबू यांनी शाहू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे सुपूर्द केला. देवस्थान समितीनेही या शालूची रितसर पावती तिरुमाला देवस्थान समितीकडे सुपूर्द केली. यावेळी तिरुपती समितीच्या एम. कंचन, वेद पारायण पंडित के. संपतकुमार, डी. जनार्दन, के. रामाराव भरत ओसवाल, आदी उपस्थित होते.

दरम्यान, तिथीनुसार अंबाबाई मंदिरात दुपारी 2 वाजता तोफेची सलामी झाल्यावर घट उठवून नवरात्रौत्सवाची सांगता करण्यात आली. घराघरातही घट उठवून नवरात्राची शेवटची माळ देवीला अर्पण करण्यात आली.

‘चामुंडा मातृका’ रुपात पूजा

अश्विन शुक्ल नवमी (गुरुवार) देवीची ‘चामुंडा मातृका’ रुपात पूजा बांधण्यात आली होती. चामुंडा ही यमाची शक्ती आहे. हिला बर्‍याचदा काली, चामुंडी म्हणूनही ओळखले जाते. ही कोल्ह्यावर आरुढ असून गळ्यामध्ये मुंडमाला तसेच हातात डमरू, त्रिशुल, तलवार व वाडगा आहे. काही धर्मग्रंथांमध्ये हिला शंकराची शक्ती मानली गेली आहे. वाघावर आरुढ असेही दाखविण्यात आले आहे. हिचा रंग गडद लाल असून, रौंद्र चेहरा आहे. ही पूजा श्रीपूजक मयुर मुनिश्वर, सोहम मुनिश्वर, सुकृत मुनिश्वर यांनी बांधली.

Back to top button