दसरा : सीमोल्लंघन करूया! - पुढारी

दसरा : सीमोल्लंघन करूया!

पावसाळा संपून घरीदारी नवीन धान्य येण्याच्या काळात आपल्या भेटीला येतो तो दसरा. पावसाळ्यात चिंब झालेली धरणीमाताही नवीन झळाळी ल्यालेली असते. निसर्गाची गंधीत अशी ही हिरवाई माणसाची जगण्याची उमेद वाढवते. ती प्रेम करायला शिकविते. अशा वातावरणात दसरा, दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांना प्रारंभ होतो. चैतन्याचे, प्रेरणादायी नव-नवीन झरे अशा सण-उत्सवांमधूनच प्रवाहित होत असतात. ते समाजमनाला माणुसकीच्या ऋणानुबंधात बांधून ठेवतात. यंदाचा दसरा, तर विशेष लाखमोलाचा. वादळ, महापुरासारख्या नैर्सगिक आपत्ती, तसेच कोरोनासारख्या जीवघेण्या रोगराईने माणसाच्या अस्तित्वालाच मुळापासून हादरा दिला होता. या तडाख्यातून सावरत-सावरत आपण सगळे यंदाच्या दसर्‍याला मोठ्या उत्साहाने सामोरे जात आहोत. ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हटले जाते. ही आनंदयात्रा पुन्हा नव्या उमेदीने सुरू झालेली आहे, ती जीवापाड जपूया! त्यामुळेच यंदाच्या दसर्‍याचे विशेष मोल. आश्विन शुद्ध दशमीला येणार्‍या या सणास विजयादशमीही म्हणतात. साडेतीन विशेष मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त. या दिवशी सीमोल्लंघन करून आपट्यांच्या पानांची पूजा करतात. आपट्याची पाने सोने म्हणून परस्परांना देतात. ती देताना ‘सोने घ्या आणि सोन्यासारखे राहा’ अशा शब्दांत शुभेच्छांची ओंजळ रिती करत माणूस माणसाला आलिंगन देतो. या गळाभेटीच्या परंपरेला नैर्सगिक आपत्ती आणि कोरोना महामारीसारख्या संकटांनी छेद दिला, माणसा-माणसात सुरक्षित अंतर निर्माण केले. भेटणे सोडा, घराबाहेर पडणेही कठीण केले. अज्ञान, भीतीने माणूस अगतिक झालेला पाहायला मिळाला खरे; पण त्याने संकटाला शरण न जाता त्याचा निकराने सामना केला. पहिली लाट, दुसरी लाट, तिसरीही येणार, चाचणी-तपासणी, लॉकडाऊन, प्राणवायूअभावी मृत्यू, निर्बंध, कोरोनाबाधितांचे दिसामाजी फुगणारे आकडे, बंदी अंशतः शिथिल, ऑनलाईन-ऑफलाईन, मास्क, सॅनिटायझर यासारखे कैक शब्द दैनंदिन जगण्याचा वेदनादायी भाग झाले. या सर्व सीमा ओलांडून माणूस नव्या प्रवासाला प्रारंभ करत आहे. नव्या वाटा शोधण्यासाठीच करावयाचे असते ते सीमोल्लंघन! समाजशास्त्रीयद़ृष्ट्या उत्सव, प्रथा-परंपरा यांना पारंपरिक अर्थ असतो, इतिहासही असतो. स्थितीच्या अवकाशात हा अर्थ, इतिहास केवळ प्रतीकात्मक राहू नये, याचीही आपण काळजी घेऊया. ती घ्यायला हवी, कारण बदलत्या गुंतागुंतीच्या काळात माणसांसमोरील संकटांची व्याप्तीही भूमिती श्रेणीने वाढत आहे. अशा स्थितीतील आव्हानांशी सक्षमतेने दोन हात करण्यासाठी सर्व प्रकारच्या सीमोल्लंघनासाठी आपली सर्वप्रकारची तयारी असायला पाहिजे. या तयारीचा मूलमंत्र ‘लढ; पण आनंदानं जगं’ हा असायला हवा. माणूस हे करेल, कारण तो माणसाच्या अस्तित्वाचा इतिहास आहे. त्यासाठीच माणूस सतत नवे-नवे सीमोल्लंघन करत आला आहे. पुन्हा नव्या-नव्या क्षितिजाचा पट तो कवेत घेत आहे. युद्ध-अणूयुद्ध, दहशतवाद, मानवी आरोग्य, भ्रष्टाचार, अज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जैव-तंत्रज्ञानाची गुंतवळ, पर्यावरण, रोजगार, अस्वच्छता, व्यसनाधिनता, राष्ट्रवाद यासारख्या जागतिक विषयांचे सीमोल्लंघन करत माणूस बदलासाठीची पुनर्रचना करत आहे. तो लढत आहे. अशा लढण्याला आनंददायी प्रेरणा आणि बळ देतात ते उत्सव-सण.

रोजच्या जगण्याच्या लढाईत अगदी छोट्या-छोट्या सरकारी कामांसाठी, अगदी एखादा कागद मिळविण्यासाठी माणसाला घायकुतीला येताना आपण पाहतो. याचे कारण ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’, या लालफितीच्या दुनियेचा अनुभव आपल्याला वारंवार घ्यावा लागतो. त्यावर मात करण्यासाठी ‘गती-शक्ती’ या राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाअष्टमीच्या मुहूर्तावर केलेला आहे. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील 16 मंत्रालये व संबंधित विभाग एका छताखाली आणली आहेत. त्यामुळे सामान्यांच्या ‘स्वप्नांची फाईल’ गतीने पळेल, पायाभूत सुविधांचे प्रकल्पही गतीने पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. रस्ते, पाणी यासारख्या पायाभूत सोयी-सुविधांनी वाढत्या लोकसंख्येपुढे अक्राळ-विक्राळ रूप धारण केलेले आहे. अशा स्थितीत ‘गती-शक्ती’सारखे उपक्रम फलदायी ठरू शकतात. ते केवळ कोणतेही एकटे सरकार यशस्वी करू शकणार नाही, तर आपणही लोकसहभाग नोंदवला पाहिजे. सरकारी कामकाजाच्या वर्षानुवर्षांच्या जुनाट पद्धतीला पूर्णविराम देण्यासाठी नव्या परिभाषेचा आपणही मनापासून स्वीकार केला पाहिजे. त्यासाठी जर्द पिवळ्या फायलींच्या ढिगांचे म्हणजेच आपल्या जर्जर मानसिकतेचे आपण सीमोल्लंघन केले पाहिजे. आपण मोबाईलवर जे हवे ते नेमके कसे बरे पाहतो? तीच चतुराई नव्या तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये दाखवली पाहिजे. राजसत्ता कोणत्याही पक्षाची असो, कोठेतरी चकाट्या पिटत त्यावर टीका करणे सोपे असते. पुढील पिढ्यांचा विचार करून संरचनात्मक कमान उभारण्यासाठी मात्र खपावे लागते. समाजमाध्यमांत भलत्याच संदेशांना ‘पुढे चाल’ देण्यास काही सेकंद पुरतात. अशा मानसिकतेने आपण आत्मनिर्भर कसे होणार? इंधनाची दरवाढ, त्यातून वाढणारी महागाईचे हे दुष्टचक्र भेदावे, भूक, भयाचा राक्षस जाळून टाकण्याचे बळ मिळो, ही आशा. कोरोनाच्या संकटात अडकलेले अर्थचक्र जागचे हलताना दिसत आहे. ते गतीने फिरण्यासाठी सार्‍यांनीच गतिमान होण्याची, आळस झटकून नव्या संकल्पांसह मोठ्या उमेदीने कामाला लागण्याचे, ‘पुनश्च हरिओम’ म्हणण्याची हीच वेळ. शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, बांधकाम, दळणवळण या मूलभूत क्षेत्रांतून सकारात्मक बदलाचे शुभसंकेत दसरा-दिवाळीच्या तोंडावर मिळत आहेत. त्यातून अर्थव्यवस्थेला गती आणि शक्ती मिळण्याची आशा आहे. अर्थात, रस्त्यांचे हमरस्ते होत असताना त्यावरून जाणारा माणूसही तितकाच सक्षम, समर्थ करण्याचे आव्हान राहीलच. आरोग्याच्या व्यवस्थेकडे केवळ राष्ट्रीय नव्हे, तर जागतिक परीप्रेक्ष्यातून पाहिले, तर लढाईची काही एक पूर्वतयारी आपण करू शकू. ‘सोन्यासारखे’ म्हणजेच चांगले राहण्यासाठी ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ म्हणावे लागेल. तात्पर्य काय, तर विचारांचेही सीमोल्लंघन आजच्या मुहूर्तावर करू या!

Back to top button