औरंगाबाद : हतनूर जि.प. शाळेचे प्रभारी केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक निलंबित | पुढारी

औरंगाबाद : हतनूर जि.प. शाळेचे प्रभारी केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक निलंबित

हतनूर (औरंगाबाद), पुढारी वृत्‍तसेवा : कन्नड तालुक्यातील हतनूर येथील जिल्हा परिषद शाळेला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेंकर यांनी अचानक भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी शाळेच्या एकूणच परिस्थितीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याबाबत त्यांची ऑडिओ क्लिप ही व्हायरल झाली होती. त्या प्रकरणाचा परिणाम म्हणून हतनूर केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख कैलास लाडके व प्रभारी मुख्याध्यापक कमलाकर खरात यांना मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना यांनी निलंबित केले आहे. तर याच प्रशालेतून पूर्वीचे प्रभारी मुख्याध्यापक एन एल मुकिंदवाड यांची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले आहे. या कारवाईने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

याबाबत कन्नड पंचायत समिती शिक्षण विभागाने दिलेल्‍या माहितीनुसार, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेंकर यांनी १६ नोव्हेंबर रोजी हतनूर जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट दिली असता काही उपक्रम व गुणवत्ता यामध्ये अनियमितता व त्रुटी असल्याचे निदर्शनास आले होते. ज्यामध्ये शाळेत कोणत्याही नेत्यांची, परमवीरचक्र विजेत्यांची व शास्त्रज्ञांची फोटो नसणे, कोणतीही जयंती व पुण्यतिथी साजरी न करणे, शालेय परिसर अस्वच्छ असणे, मुख्याध्यापक कक्षात मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या माहितीचा फलक व शाळेचे आर्थिक अभिलेखे अद्ययावत नसणे, ग्रंथालय नोंद रजिस्टर नसणे, विषयनिहाय गुणनोंद पत्रक नसणे, शाळेतील ग्रंथालय, संगणक व विज्ञान प्रयोग शाळेतील उपकरणांची वापर न करणे, शिक्षकांच्या रजा नोंदी नसणे, पालक सभा व शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर नसणे आदी गंभीर स्वरूपाचे बाबी चौकशीतून निदर्शनास आलेल्या होत्या.

इयत्ता दहावीच्या विदयार्थ्यांबरोबर हितगुज साधत विविध विषयांवर प्रश्न विचारले असता बहुतेक विदयार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे देता आली नव्हती. त्यामुळे विभागीय आयुक्त केंद्रेंकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच याबाबत संबंधितांनी केलेले खुलासे असमाधानकारक असल्यामुळे हतनूर चे प्रभारी केंद्रप्रमुख कैलास लाडके व प्रभारी मुख्याध्यापक कमलाकर खरात यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात लाडके यांचे मुख्यालय गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गंगापूर तर खरात यांचे मुख्यालय गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती वैजापूर येथे आहे.

हेही वाचा  

नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग प्रकरणी 6 विद्यार्थ्यांवर कारवाई

धक्‍कादायक : परभणीतील कमलापूर येथे पतीने केले पत्नीचे शिर धडावेगळे

पुणे: पार्टीला गेलेल्या कॉलेज तरूणीवर बलात्कार, आरोपीला बेड्या

Back to top button