पुणे: पार्टीला गेलेल्या कॉलेज तरूणीवर बलात्कार, आरोपीला बेड्या | पुढारी

पुणे: पार्टीला गेलेल्या कॉलेज तरूणीवर बलात्कार, आरोपीला बेड्या

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कॉलेज तरूणांबरोबर पार्टीला गेलेल्या आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या तरूणीने दारू पिल्यानंतर तिला फ्लॅटच्या गॅलरीत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार कर्वेनगर येथील हिंगणे होम कॉलनीमध्ये घडला. या प्रकरणी अत्याचार करणार्‍या एकाला वारजे माळवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. स्वप्निल ठाणगे (24) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 20 वर्षीय इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणार्‍या तरूणीने फिर्याद दिली. तरूणीचा आकाश वाघमारे नावाच्या मित्राचा संशयीत आरोपी स्वप्निल हा मित्र आहे. हा प्रकार 27 नोव्हेंबरच्या पहाटे घडला.

एकाच कॉलेजचे असल्याने त्यांचा पार्टीचा प्लॅन ठरला होता. मात्र भूगावला फार्महाऊसवर पार्टीसाठी जाण्याची कालेजच्या मित्रांची आणि फिर्यादीची योजना ठरल्यानंतर त्यांच्याकडे गाडी नव्हती. परंतु, त्यातील एकाने त्याच्या मित्राची कर्वेनगर येथे गाडी आहे, असे सांगून ते त्याच्या फ्लॅटवर गाडी पाहण्यासाठी गेले. परंतु त्यांना गाडी उपलब्ध न झाल्याने त्यांनी त्यांच्या भूगाव येथील पार्टीची योजना बदलली. त्यांनी कर्वेनगर येथील एका मित्राच्या घरी पार्टी करण्याचे ठरवले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांनी तिथे दारू प्राशन केली. यावेळी फिर्यादी तरूणीनेही दारू प्राशन केली. त्यातील दोघेजण जेवण आणण्यासाठी बाहेर गेले. यावेळी तरूणीला अचानक उलट्या होऊ लागल्याने संशयीत आरोपी स्वप्नील हा पिडीत तरूणीला गॅलरीमध्ये घेऊन गेला. तिथेच त्याने गॅलरीचा दरवाजा बंद करून तरूणीवर बलात्कार केला. आपल्यावर अत्याचार झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर तरूणीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. दरम्यान संबंधीत आरोपीला अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके यांनी सांगितले.

Back to top button