मुहूर्त ठरला : नाशिकमध्ये मंगळवारी ठाकरे गटाला पडणार भगदाड | पुढारी

मुहूर्त ठरला : नाशिकमध्ये मंगळवारी ठाकरे गटाला पडणार भगदाड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या 12 माजी नगरसेवकांचा शिंदे गटातील प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. मुंबईत सोमवारी, दि. 28 नोव्हेंबरला संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलिशान हॉटेलमध्ये हे नगरसेवक जेवण घेणार असून, मंगळवारी, दि. 29 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी प्रवेश सोहळा होेणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेत शिंदे गटाची सत्ता आल्यास निवडून आलेल्या नगरसेवकांना विविध पदे दिली जाणार असल्याचे समजते. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठे भगदाड पडणार आहे.

जूनमध्ये सत्तांतरानंतर राज्यभरातून शिंदे समर्थकांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात दाखल झाले. पण, राज्याच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात शिंदे गटाला म्हणावा, तसा प्रतिसाद लाभला नाही. पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे व आमदार सुहास कांदे हे मातब्बर वगळता बोटावर मोजण्याइतपत पदाधिकारी शिंदे गटाच्या तंबूत दाखल झाले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाची शिवसेना अभेद्य असल्याचे दाखले पक्षाचे नेतेमंडळी देत होते. तर दिग्गज नेत्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी शिंदे गटाच्या स्थानिक पातळीवर मोठा दबाव होता. अखेर नाशिक मनपातील ठाकरे गटाच्या माजी 12 नगरसेवकांना गळाला लावण्यात शिंदे गट यशस्वी झाला आहे. यासर्व नगरसेवकांचा मंगळवारी (दि.29) मुंबईत शक्तिप्रदर्शन करत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये शिंदे गटाची सत्ता आल्यास किंवा जे काही नगरसेवक निवडून येतील त्यांच्यातून महापौर व उपमहापौरांसह स्थायी समिती सभापती, गटनेते, विविध विषय समित्या, गटनेते पद आदींची बोलणी केली जाणार असल्याचे समजते.

निधीवर चर्चा…
शिंदे गटात प्रवेश करणार्‍या माजी नगरसेवकांसमवेत मुख्यमंत्री सोमवारी (दि.28) मुंबईतील हॉटेलमध्ये जेवण घेतील. जेवणानंतर मुख्यमंत्री संबंधित सदस्यांसमवेत प्रभागांमधील विकासकामांसंदर्भात तसेच निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करतील. तसेच याच बैठकीत प्रमुख प्रश्नांवरही चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

स्वागताची जय्यत तयारी…
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी प्रवेश करणार्‍या माजी नगरसेवकांसह अन्य पक्षांतून येणारे पदाधिकारी एकत्रितरीत्या नाशिककडे कूच करतील. शहरात पाथर्डी फाटा येथे या सर्वांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून हे पदाधिकारी शालिमार येथील शिवसेना भवन परिसरातून मार्गस्थ होऊन शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. शिंदे गटाकडून यानिमित्ताने शहरात शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

हेही वाचा:

Back to top button