सिनेमा : डिलिव्हरी बॉयची वेदना डिलिव्हर करणारा ‘झ्विगॅटो’! | पुढारी

सिनेमा : डिलिव्हरी बॉयची वेदना डिलिव्हर करणारा ‘झ्विगॅटो’!

खाण्यापासून वाणसामानापर्यंत आणि कपड्यापासून मोबाईलपर्यंत सारं आता ऑनलाईन ऑर्डर केलं जातं. ते आपल्या दारापर्यंत आणणार्‍या डिलिव्हरी बॉयला अनेकदा लिफ्ट, पार्किंग वापरता येत नाही, एवढंच काय तर साधं पाणीही बहुतेक जण विचारत नाहीत. पोटापाण्याच्या मजबुरीनं, इन्सेंटिव्ह आणि रेटिंगसाठी उन्हातान्हात फिरण्याच्या या नव्या रोजगाराचं वास्तव सांगणारा ‘झ्विगॅटो’ हा सिनेमा येतोय.

साधी पावभाजी हवी असेल तरीही हल्ली स्विगी किंवा झोमॅटोवरून मागवली जाते. गावाखेड्यातही अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टची डिलिव्हरी पोहोचू लागलीय. कोरोना दरम्यान आणि त्यानंतर तर या होम डिलिव्हरीची सवय सर्वांनाच लागलीय. बाजाराचं सगळं चित्रच या डोअरस्टेप डिलिव्हरीनं बदलून टाकलंय. डिलिव्हरी बॉय हा एक बिनचेहर्‍याचा माणूस या सगळ्या यंत्रणेचा कणा आहे. त्याच्या माणूसपणाचं विदारक चित्र मांडणारा सिनेमा दिग्दर्शिका आणि अभिनेत्री नंदिता दास घेऊन येतायत. सिनेमाचं नाव आहे ‘झ्विगॅटो’. स्विगी, झोमॅटो यांच्या मिश्रणातून हे नाव तयार झाल्याचं कोणीही सांगेल. पण या नावातून नंदिता यांनी ब-ँडची जाहिरात करणारं टी शर्ट घालून स्कूटरवरून धावणार्‍या पाठीवर चौकोनी बॅग लावलेल्या त्या बिनचेहर्‍याच्या माणसाला आवाज देण्याचा प्रयत्न केलाय.

आजवर कॉमेडी शोमन म्हणून ओळखला जाणारा कपिल शर्मा हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतोय. सिनेमाचा ट्रेलर यू ट्यूबवर रिलिज झालाय. त्यावरून तरी एका संवेदनशील विषयाला नंदितानं हात घातलाय, अशी जाणीव होतेय. हा सिनेमा या वर्षीच्या ‘टोरोंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये दाखवला गेला. त्यानंतर ‘बुसान फिल्म फेस्टिव्हल’मध्येही त्याचा प्रीमियर झाला. दोन्ही ठिकाणी या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला. तिथल्या माध्यमांमध्ये या सिनेमावर चर्चा झाल्या. त्यामुळेच आता हा सिनेमा भारतात कसा प्रतिसाद मिळवतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अजूनही या सिनेमाची भारतातल्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली नसली, तरी वर्षअखेरपर्यंत तो प्रदर्शित व्हायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त होतेय. सिनेमाची थीम काय? कपिल शर्मा हा एका कारखान्यात काम करणारा कामगार. कोरोनाकाळात त्याला नोकरीवरून काढून टाकलंय.

आता भाड्याच्या घरात राहणार्‍या बायकापोरांसह स्वतःचं पोट कसं भरायचं, या चिंतेनं तो ‘झ्विगॅटो’ नावाच्या फूड डिलिव्हरी करणार्‍या कंपनीत कामाला लागतो. रोज स्कूटरवरून जास्तीत जास्त डिलिव्हरी करायच्या, ग्राहकांसोबत सेल्फी काढायचे, त्यांना चांगलं रेटिंग देण्यासाठी गळ घालायची असले धंदे करत दिवस ढकलत असतो. बायकोच्या, मुलांच्या नजरेत त्याचं स्थान उतरत जात असतं. आज दहा ऑर्डर करून जास्त पैसे आणेन, असं तो मुलाला सांगतो; तर मुलगा त्याला म्हणतो की, तुम्ही असं रोजच बोलता. बायको त्याला म्हणते की, तुम्ही साधी सीरियलही माझ्यासोबत बघत नाही. बिल्डिंगमध्ये त्याला लिफ्टने जायला हटकलं जातं. अशा अनेक रोजमर्‍याच्या गोष्टीनं हैराण झालेल्या त्याच्या घरात वडील राहायला येणार असतात. आधीच खर्चाचं बिघडलेलं गणित कसं सावरायचं या चिंतेत असताना बायको नोकरी करायचा निर्णय घेते. त्यामुळे त्याच्यातल्या पुरुषत्वाला धक्का बसतो.

बाईची नोकरी, पुरुषाची मजबुरी, बायकोच्या निर्णयाबद्दल त्याच्यातला पुरुष दुखावतो. तो तिला सांगतो की, अच्छा नही लगता तुमसे काम करना. तर ती त्याला सांगते, आप थोडी ना करा रहे है, हम कर रहे है. बायकोचा स्वाभिमान त्याला सुखावतही असतो आणि दुखावतही. त्या दोघांमधलं नातं हळुवार आहे, एकमेकांना समजून घेणारं आहे. तरीही त्याला आपल्यामुळे बायकोला घराबाहेर पडावं लागणार असल्याचं शल्य आहे. तो तिला अनेक परींनी समजावतो. तीही तेवढ्याच शिताफीनं त्याला पटवते आणि शेवटी घराबाहेर पडतेच. सिनेमाचा ट्रेलर आणि एक सीन यू ट्यूबवर रिलिज झालाय. त्यातून जो सिनेमा जाणवतोय, त्यात आपल्याला रोज दिसणार्‍या या डिलिव्हरी बॉयच्या घरात काय चाललं असेल त्याची कल्पना येते.

एकीकडे वाढणारी महागाई, दुसरीकडे मुलांच्या आई-वडिलांकडून असलेल्या अपेक्षा आणि त्याला तोंड देताना त्यांची होणारी ओढाताण या सगळ्याचं हृदयद्रावक, पण तेवढंच हृदयस्पर्शी चित्र या सिनेमातून उभं करण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय. ट्रेलरमध्य डिलिव्हरीच्या पाठी धावणार्‍या कपिलला काही कामगार वैद्यकीय मदतीसाठी अडवण्याचा प्रयत्न करत असतात. पण, याला थांबणं शक्यच नसतं. पुढे ‘वो मजदूर है, इसलिये मजबूर है’ या एका घोषणेवर तो उत्तरतो की, ‘वो मजबूर है, इसलिये मजदूर है.’ आपल्याला मजबुरीमधून कराव्या लागणार्‍या या मजदुरीची वेदना तो ज्या पोडतिडकीनं मांडतो, त्यातून सिनेमाचा आशय अधिकच गडद होऊ लागतो. नात्यांच्या बाजारामर्ध्ीये नवरा, बाप, मुलगा आणि कामगार या सगळ्या नात्यांमधे फिट्ट बसण्यासाठी तो जे काही करतो, ते त्या दीड मिनिटांच्या ट्रेलरमध्ये घट्ट बसवलंय.

एकीकडे त्याची मुलगी त्याला म्हणते की, ‘आप और कुछ काम क्यू नही करते?’ त्यावर तो उत्तरतो की, ‘खाना खिलाना तो बहोत पुण्य का काम है.’ दुसरीकडे बायको म्हणते की, ‘फॅक्टरीत आप का काम कम से कम दिखता तो था, यहा रेटिंग, सेल्फी… ये सब अजीब मुसीबत है.’ शेवटी या नात्यांनाही आपला माणूस काय काम करतो, याबद्दल अपेक्षा असतातच. त्या पूर्ण करायच्या की त्यांचं पोट भरायचं, या द्वंद्वामधला अंडरकंरट खूप बोचरा ठरतो. बायको जेव्हा त्याला म्हणते की, तुम्ही साधी सिरियलही हल्ली माझ्यासोबत बघत नाही, तेव्हा तो तिला म्हणतो की, ‘आप देख रही है ना मेरे बदले में’ आणि तो तिला जवळ घेतो. तेव्हा त्या दोघांमधलं प्रेम, त्याच्या आणि तिच्या नात्याची केमिस्ट्री हळव्या रंगात रंगवलेली दिसते. स्वतःला सिद्ध करण्यासाठी दररोज, हरक्षणी धावत राहायचं, पण ते कोणासाठी? ती नातीच जर आपली उरली नाही तर या सगळ्याचा फायदा काय, अशी एक भीतीही सतत त्याच्या डोळ्यात दिसत राहते.

पोर्‍या ते डिलिव्हरी पार्टनर होम डिलिव्हरी या संकल्पनेनं शहरापासून गावापर्यंतच्या सप्लाय चेनचा हिशेबच बदलून टाकलाय. कधीकाळी फक्त दूध आणि पेपर घरी मिळायचे. तेही साधारण शहरी भागात. पण आता दूध-पेपरसह ब-ेड, बटर, चीज, अंडी या सगळ्याचं ‘गुड मॉर्निंग पॅकेज’ डिलिव्हर होऊ लागलंय. आता थेट गोठ्यातून घरापर्यंत आणणारं महागडं दुधाचं नेटवर्क सुरू झालंय. भाज्या काय तर फार्मफ-ेश, फळ काय तर सनकिस्ड, बेकरी प्रॉडक्ट काय तर ओव्हनफ-ेश अशा नानाविध विशेषणांनी मार्केटिंग करत या ऑनलाईन कंपन्या थेट आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन धडकतात. कधी काळी पेपर, दूध टाकणारा ‘पोर्‍या’ आता ‘डिलिव्हरी पार्टनर’ झालाय. ऑनलाईन ग्रोसरी स्टोअरनी नाक्यावरच्या वाण्याचं धाबं दणाणून सोडलंय; तर रेडिमेड कपड्यांच्या ऑनलाईन खरेदीमुळे टेलर, कपड्याची दुकानातली गर्दी आटलीय.

अजूनही लोकांची दुकानात समोरासमोर वस्तू घेण्याची वर्षानुवर्षाची सवय मोडलेली नाही. त्यामुळे अनेकजण आजही ऑफलाईन मोडमध्ये असल्यानं नाक्यावरला बाजार पूर्णपणे उठलेला नाही. पण, हादरला नक्कीच आहे. त्यामुळेच अनेक दुकानदारांनीही आता ‘फ्रीहोम डिलिव्हरी’चे बोर्ड लावलेले दिसतात. पण या गिर्‍हाईक खेचण्याच्या स्पर्धेत सर्वात उपेक्षित राहतो, तो डिलिव्हरी बॉय. हा डिलिव्हरी बॉय खाणं डिलिव्हर करणारा असो की ग्रोसरी, ऑनलाईन चेनमधला असो की ऑफलाईन दुकानातला. माणूस म्हणून त्याला शहरात किंमत किती मिळते, हा चिंतेचा मुद्दा ठरलाय. कोरोनाकाळात तर त्यांचे हाल कोणी खात नव्हतं, अशी परिस्थिती होती. अशा शेकडो जणांच्या मुलाखती घेऊन ‘झ्विगॅटो’ हा सिनेमा बनवल्याचं दिग्दर्शिका नंदिता दास यांनी एका मुलाखतीत सांगितलंय.

माणूस आणि अल्गोरिदममधला संघर्ष ‘झ्विगॅटो’च्या ट्रेलरमधे शेवटचा सीन असा आहे की, त्याची बायको त्याला विचारते, ‘रेटिंग तो ठीक था ना? इन्सेंटिव्ह मिलेगा? त्यावर तो वैतागून बोलतो की, ‘वोह तो चाहते है की, हम इन्सेंटिव्ह के पीछे सारा दिन गोल गोल घुमते रहे. किसी से कुछ ना कहे. सारा समय गुड बॉय बन के रहे.‘ या सगळ्यातून ट्रेलर संपताना उरते ती या डिलिव्हरी बॉयच्या पदरी पडलेली, हताशपणे येणारी यांत्रिकता. माणूस म्हणून त्यांच्या भावनांना या रेटिंग, इन्सेंटिव्हच्या अल्गोरिदममध्ये काहीही स्थान नसल्याची खोल खोल विषण्णता. सिनेमात एके ठिकाणी तो ऑर्डरची वाट पाहत असताना, त्याची ‘ऑर्डर डिक्लाईन’ होते. त्यामुळे तो भयंकर चिडतो. हातातला फोन फेकून देतो. त्याच्या या देहबोलीतून त्याच्या मनात ठासून भरलेली चीड, राग आणि परिस्थितीपुढे हतबल ठरलेला त्याचा आत्मसन्मान सारं सारं प्रकटतं.

माणूस म्हणून त्याला जे काही हवंय ते मिळवण्यासाठी कष्ट करायची त्याची तयारी आहे. पण यांत्रिक गणित बांधत येणार्‍या अल्गोरिदमच्या हातातलं बाहुलं होणं, त्याला कुरतडत जातंय. आज सगळ्या ऑनलाईन बिझनेसची गणितं अल्गोरिदम ठरवतंय. जिथं माणसाला काहीच किंमत नाही, अशी परिस्थिती आहे. तुम्ही कसल्या परिस्थितीत आहात, तुम्हाला काय वाटतंय याचं आम्हाला काहीही पडलेलं नाही. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत ‘डिलिव्हर’ केलं पाहिजे, हे आजच्या वर्क कल्चरचं सूत्र आहे. ते जरी आज या डिलिव्हरी बॉयच्या आयुष्यातल्या या सिनेमानं मांडलं असलं, तरी ते त्या बॉयपासून कॉर्पोरेट मॅनेजरपर्यंत सर्वांना सारखंच
आहे. त्यामुळे माणूस आणि मशिन अल्गोरिदम यांच्यातल्या संघर्षाची ही कहाणी आजच्या काळावर भाष्य करते.

आजचं जग हे गिग इकॉनॉमीचं आहे, असं सगळीकडं म्हटलं जातंय. गिग इकॉनॉमीची साधी सोपी व्याख्या म्हणजे, कामगार ही कंपनीची जबाबदारी नाही. दुसर्‍या कंपनीकडून किंवा थेट, पण छोट्या कालावधीसाठी, तात्पुरत्या करारावर माणसं घेऊन त्यांच्याकडून काम करून घ्यायची. हे सगळं दुष्टचक्र आहे. कितीही आकांडतांडव केला तरी, आज ते अपरिहार्य ठरलंय. त्यामुळे अनेक कंपन्या या पद्धतीनं काम करून घेऊन स्वतःची बॅलन्सशीट चढती ठेवतायत.

एकीकडे कामगारांच्या चळवळी, कामगार कल्याणाचे कायदे या सगळ्याला हरताळ फासण्याचं काम जागतिकीकरणानं केलं. त्यामुळे कामगार हा कॉर्पोरेट क्षेत्रातला चकाचक कपड्यातला आधुनिक गुलाम ठरलाय. त्या कॉर्पोरेट गुलामांच्या घरी येणार्‍या पगाराला पुन्हा बाजारात आणण्यासाठी मार्केटिंगची सगळी शस्त्रं पारजून त्यांच्या सवयी बदलल्या जात आहेत. त्यातूनच खाण्यापासून धुण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी रेडिमेड कशा मिळतील, यासाठी आजचं अर्थकारण काम करतंय. भांडवलशाही आणि त्यातून उभी राहणारी नवी गुलामगिरी ही सर्वांना कळत असूनही, तिच्यावर कसा उतारा शोधावा, हे अजूनही कुणालाच उमगलेलं नाही. कारण या गुलामगिरीवर उपाय शोधणारेही शेवटी याच गुलामगिरीच्या आहारी जातात, असं आजचं चित्र आहे. या अनुत्तरित प्रश्नाला किमान तोंड फोडण्याचं काम तरी ‘झ्विगॅटो’करेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

नीलेश बने

Back to top button