शिवसेना नैसर्गिक मित्र नाही : नाना पटोले

शिवसेना नैसर्गिक मित्र नाही : नाना पटोले

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिलेले असताना, शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र नाही, असे विधान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी (दि.3) औरंगाबादेतील पत्रकार परिषदेत केले. त्यामुळे या पदयात्रेत उद्धव ठाकरे सहभागी होतील का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा 7 नोव्हेंबरला नांदेडमध्ये येत असून, त्या अनुषंघाने आढावा बैठक घेण्यासाठी पटोले गुरुवारी शहरात आले होते. सुभेदारी विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हि पदयात्रा राजकीय नसून देशहितासाठी आहे. सगळ्या जाती-धर्माच्या लोकांना जोडण्यासाठी आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी डाव्यांसह शरद पवार, उद्धव ठाकरे अशा भाजप विरोधी सगळ्यांना निमंत्रण दिले असून, कोण कोण येतील, हे यात्रेत आल्यावर तुम्हांला दिसतील, असेही ते म्हणाले.

एका विपरित परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले होते. कॉमन मिनिमम प्रोग्रॅम त्यासाठी ठरला होता, असे सांगत त्यांनी परिस्थिती सांगितली. शिवसेना मित्रपक्ष नाही, या त्यांच्या विधानाबद्दल विचारले असता, ते म्हणाले, अंधेरीची सीट आमचीच होती, आमचे सुरेश शेट्टी अनेकवेळा आमदार म्हणून निवडून आले, गेल्यावेळी त्यांचा पराभव झाला. अंधेरी निवडणूक लागल्यानंतर आम्ही स्वत: उद्धवजीकडे गेलो, त्यांना हिंमत दिली. ही सीट 40-50 हजारांच्या फरकाने निवडून येईल, असे त्यांना सांगितले.

महाराष्ट्रात परंपरा आहे, गोपीनाथजी गेले, त्यानंतर तिथे त्यांच्या परिवारातील लोकांना बिनविरोध निवडून देण्यात आले. मग देगलूर, पंढरपूर, कोल्हापूरमध्ये ही परंपरा का पुढे गेली नाही. मग इथेच अंधेरीमध्येच परंपरा कशाला ? एमसीएच्या निवडणुकीत हे सगळे तिघे एकत्रित आले. आम्ही जाहीरपणे सांगितले, भाजप या देशाला बरबाद करतोय. उद्योग सगळे गुजरातमध्ये नेत आहेत, त्यांच्याशी मैत्री कशाला, खेळात असो की मैदानात असो.. आमची भूमिका स्पष्ट आहे.

17 ऑक्टोबर रोजी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांना यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी होतील, असे आश्वासन देण्यात आले होते. आता पटोले यांच्या विधानाला ठाकरे यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news