

हैदराबाद; पुढारी ऑनलाईन : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणात आली आहे. या यात्रेदरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. यात्रेच्या ५७ व्या दिवशी राहुल गांधी यांनी स्वत:वरच आसुडाचे फटके ओढले आहेत. राहुल गांधी यांचा हाच स्वत:वर आसूड ओढून घेण्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा प्रकार थोडासा धक्कादायक असला तरी फारसे घाबरण्यासारखे काही घडले नाही. या व्हिडिओचे सत्य असे आहे की, तेलंगणामध्ये सध्या एक पारंपरिक उत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवातील परंपरेनुसार राहुल गांधींनी स्वत:वर आसुडाचे फटके मारुन घेतले आहेत. (Bharat Jodo Yatra)
व्हायरल होत असणाऱ्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांनी एका व्यक्तीकडून आसूड घेतला आणि स्वत:वर त्याचे फटके मारुन घेतले. दरम्यान हे पहात असणाऱ्या आजूबाजूच्या लोकांनीही यावेळी राहुल गांधी यांचा उत्साह वाढवला. हैदराबाद आणि सिकंदराबाद या भागात 'बोनालू' हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा उत्सव महाकाली देवीला समर्पित केला गेलेला आहे. पोथराजू अर्थात महाराष्ट्रात पोतराज असतो तसा हा पोथराजू या उत्सवाचा मुख्य चेहरा आहे. या उत्सवात पोथराजू देवीच्या समोर स्वत:वर आसुडाचे वार झेलतो. यावेळी या परंपरेचा भाग होत राहुल गांधी यांनी सुद्धा पोथराजूच्या भूमिकेत जात स्वत:वर आसूड ओढून घेतले. (Bharat Jodo Yatra)
तेलंगणातील स्थानिक पौराणिक आख्यिायिकानुसार पोथराजू हा महाकाली देवीचा भाऊ आहे. पोथराजूकडे बोनम घेऊन जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. या संपूर्ण उत्सवाच्या आकर्षणाचा प्रमुख केंद्रबिदू हा पोथराजू असतो. तो या महाकाली देवीच्या मिरवणुकीत सर्वात पुढे असतो आणि तो स्वत:वर आणि इतरांवर आसूड ओढत ढोलच्या तालवर नाचतो. पोथराजू हा जाड-जूड, पोट सुटलेला आणि रुबाबदार व्यक्ती असतो त्याला अनेक रंगांनी रंगवलेले असते. त्याचे शरीर हळद आणि चंदनाच्या लेपाने माखलेले असते. या उत्सवातील हा पोथराजू हा एक प्रकारे या सणातील सर्व स्त्रीयांचा भाऊराया म्हणून समजला जातो.
काय आहे बोनालू उत्सव
महाकाली देवीचे आभार व्यक्त करण्यासाठी बोनालू हा उत्सव साजरा केला जातो. याची सुरुवात १९ व्या शतकाच्या सुरुवातीस झाल्याचे सांगण्यात येते. १८१३ साली हैदारबाद आणि सिकंदराबाद परिसरात मोठ्या प्रमाणात कॉलरा रोग पसरलेला होतो. दरम्यान हैदराबाद येथून एक सैन्याची तुकडी उज्जैन येथे पाठविण्यात आली होती. जेव्हा या रोगाची माहिती सैन्याला लागली तेव्हा त्यांनी उज्जैनच्या महाकाली मंदिरातील देवीला नवस केला. जर देवीच्या आशीर्वादाने कॉलराचा प्रकोप दूर झाला तर हैदराबाद शहरात देवीच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात येईल. असे मानले जाते की, देवीच्या कृपेने कॉलरापासून सैन्याची व लोकांची सुटका झाली. पुढे सैन्य हैदराबादला परतल्यानंतर नवस मागितल्या प्रमाणे शहरात महाकाली देवीच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. तेव्हा पासून या देवीचे आभार मानण्यासाठी बोनालू या उत्सवाची परंपरा सुरु झाली.
2014 मध्ये तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर बोनालूला राज्य उत्सव म्हणून घोषित करण्यात आले. गोलकुंड किल्ल्यातील श्री जगदंबा मंदिर, सिकंदराबाद येथील श्री उज्जयिनी महाकाली मंदिर आणि लाल दरवाजा येथील श्री सिंहवाहिनी महाकाली मंदिर आणि हरिबावली येथील श्री अक्कन्ना मदन्ना महाकाली मंदिर या ठिकाणी मुख्य उत्सव साजरा केला जातो. अक्कन्ना मदन्ना मंदिरापर्यंत मिरवणुकीने या उत्सवाचा समारोप होतो.
अधिक वाचा :