पुणे : दुचाकी चोरणार्‍या दोघांना अटक | पुढारी

पुणे : दुचाकी चोरणार्‍या दोघांना अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दुचाकी चोरट्यांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. इंद्रनाथ ऊर्फ समाधान श्रीराम तिरमले (वय 20), सुरेश ऊर्फ भय्या रामधन मुंडे (वय 20, दोघे रा. टाकेवाडी, फुलारवाडी वस्ती, ता. परळी, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तिरमले आणि मुंडे यांनी उत्तमनगर, तसेच चंदननगर भागातून दोन दुचाकी चोरल्या होत्या.

डेक्कन जिमखाना भागात दोघे दुचाकीवरून आले होते. त्यांच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याची माहिती दरोडा आणि वाहनचोरी पथकाला मिळाली. गस्त घालणार्‍या पोलिसांनी दोघांना आपटे रस्ता परिसरात सापळा लावून पकडले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारणा करण्यात आली, तेव्हा दोघांनी दुचाकी चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. तपासात दोघांनी उत्तमनगर आणि चंदननगर भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. दोघांकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, शाहीद शेख, बाळू गायकवाड, नीलेश शिवतारे, धनंजय ताजणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button