महाराष्ट्र के रंग, पंजाब के संग..! | पुढारी

महाराष्ट्र के रंग, पंजाब के संग..!

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : आजादी का अमृतमहोत्सव व शिवाजी विद्यापीठाचा हीरक महोत्सव या संयुक्त निमित्ताने विद्यापीठामार्फत सांस्कृतिक आदान-प्रदान उपक्रमाचे आयोजन केले आहे. अंतर्गत पंजाबमधील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा संघ शुक्रवार , दि. 27 पासून कोल्हापूरच्या दौर्‍यावर येत आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सांस्कृतिक आदान-प्रदान उपक्रमांतर्गत यापूर्वी 7 एप्रिल रोजी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा एक संघ पंजाब येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये 10 ते 14 एप्रिलदरम्यान दाखल झाला. विद्यार्थ्यांनी देवी तालाब मंदिर, करतारपूर येथील जंग ए आजादी मेमोरियल, अमृतसरमधील सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग व वाघा बॉर्डर अशा ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा असलेले लोकनृत्य, लावणी, सुगम गायन, मूकनाट्य, देशभक्तीपर लघुनाटिका, वासुदेव, गोंधळ, आराधी, भारुड आदी महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित पंजाबमधील विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवले.

सांस्कृतिक आदान-प्रदानाचा पुढचा टप्पा म्हणून पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा 51 जणांचा संघ दि.27 ते 31 मे रोजी शिवाजी विद्यापीठात असणार आहे. यानिमित्ताने भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. पंजाबची लोकसंस्कृती, लोकनृत्य, लोकगीते व पारंपरिक कला प्रकार येथील विद्यार्थी, नागरिकांना समजावेत यासाठी पंजाबचे विद्यार्थी स्थानिक कलाप्रकार सादर करतील. महाराष्ट्राची लोकधारा, मूकनाट्य, देशभक्तीपर लघुनाटिका, महाराष्ट्रीयन वाद्यवृंद, भारतीय वाद्यवृंद, राग यमन कल्याणमधील विविध गायकांनी गायलेल्या विविध गाण्यांचे मुखडे असलेला कार्यक्रम सादरीकरण शिवाजी विद्यापीठाचा संघ सादर करणार आहे. हा कार्यक्रम 30 व 31 मे रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात होणार आहे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी. आर. पळसे, डॉ. शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.

ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरांचा करणार अभ्यास
पंजाबचे विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ परिसरासह कोल्हापुरातील कणेरी मठ, न्यू पॅलेस, भवानी मंडप, अंबाबाई मंदिर, महाद्वार रोड, मोतीबाग तालीम, कोल्हापुरी चप्पल लाईन, रंकाळा आदी विविध ठिकाणी भेटी देऊन ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरांचा अभ्यास करणार आहेत.

Back to top button