मंचर : पुढारी वृत्तसेवा
सध्या कांद्याचे बाजारभाव कमी झाल्याने शेतकर्यांच्या डोळ्यांत कांद्याने पाणी आणले आहे. पाच ते दहा रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत असल्याने शेतकरीवर्गाला खर्चही मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. साठवणूकसुद्धा मोठ्या प्रमाणावर झालेली असल्याने पुढील काळातही बाजारभावाची कोणतीही शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सध्या कांद्याचे बाजारभाव पडले असून, पाच ते दहा रुपये प्रतिकिलो दराने कांदा विकला जात आहे. या वर्षी कांद्याला मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च झाल्याने कांद्याचा भांडवली खर्च वजा जाता शेतकर्यांच्या हातात जास्त काही रक्कम शिल्लक राहत नाही. त्यामुळे इतके दिवस मेहनत करून पिकवलेला कांदा कवडीमोल बाजारभावाने विकावा लागत असल्याने कांद्याने शेतकर्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.बाजारभाव नसल्याने शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बराखीत साठवला आहे.
त्यामुळे शेतकर्यांच्या बराखीही फुल झाल्या आहेत. ज्या शेतकर्यांनी या वर्षी कांदा लागवड कमी केली, त्यांनी कांदा खरेदी करून कांदा साठवणूक मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यामुळे भविष्यातही कांद्याचा चांगल्या प्रकारचा पुरवठा होणार आहे. परिणामी, येणार्या कालखंडातही कांद्याचे बाजारभाव वाढतील का नाही, याबाबत शंका आहे. सध्यातरी कांद्याचे भाव गडगडले नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, भविष्यातही कांद्याचे बाजारभाव वाढले नाहीत, तर या वर्षी शेतकर्यांची आर्थिक गणिते चुकणार आहेत.