‘उजनी’च्या पाण्यासाठी सोलापूरकरांचा जळफळाट का ; इंदापूरकरांचे धरणासाठी जमिनींसह संसारही झालेत उद्ध्वस्त | पुढारी

‘उजनी’च्या पाण्यासाठी सोलापूरकरांचा जळफळाट का ; इंदापूरकरांचे धरणासाठी जमिनींसह संसारही झालेत उद्ध्वस्त

संदीप बल्लाळ 

वरकुटे खुर्द :

फक्त एक टीएमसी पाण्यास विरोध करणार्‍या सोलापूरकरांनी इंदापूर व बारामती तालुके पाकिस्तानमध्ये नाहीत आणि उजनी धरणासाठी इंदापूरकरांचेही संसार उद्ध्वस्त झाले आहेत, याचे भान ठेवायला हवे, अशा भावना इंदापूरच्या धरणग्रस्तांनी व्यक्त केल्या आहेत. उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील लाकडी-लिंबोडी पाणी उपसा योजनेसाठी आठ दिवसांपूर्वी जलसंपदा खात्याने प्रशासकीय मंजुरी दिली. सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी याला विरोध केला आहे. फक्त एक टीएमसी पाणी इंदापूर व बारामती तालुक्यातील 20 गावांसाठी मंजूर केले आहे. ही योजना गेल्या 25 वर्षांपूर्वीपासून जलसंपदा खात्याकडे प्रलंबित होती. एक टीएमसी पाण्यासाठी सोलापूरकर विरोध करीत आहेत, यावर इंदापूर तालुक्यात अतिशय तीव्र भावना आहेत.

लाकडी-निंबोडी योजनेसाठी सोलापूरला मिळणार्‍या पाण्याचा एक थेंबही या दोन्ही तालुक्यांत जाणार नाही किंबहुना त्याचा या योजनेशी काही संबंध नाही. राज्य सरकारने ऑक्टोबर 2021 रोजी केंद्र सरकारला दिलेल्या कृष्णा-भीमा खोर्‍यातील एकूण 599 टीएमसी पाणी भीमा प्रकल्पासाठी आरक्षित केल्याचे नमूद केले आहे. सीना-माढा, दहिगाव, आष्टी, शिरापूर, बार्शी, सांगोला यांचा त्यात समावेश आहे. या योजनेसाठी 83.94 टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे. 2004 ला प्रकल्पाच्या अहवालात लाकडी-लिंबोडी योजनेचा समावेश झाला नसल्याचे दिसून येते. त्यात 0.90 टीएमसी पाण्याची तरतूद करण्यात आली होती. 2018 मध्ये एकात्मिक राज्य जल आराखड्यामध्ये या पाण्याची तरतूद निश्चित करण्यात आली. 2019 मध्ये तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालात 0.57 टीएमसी पाण्याची तरतूद झाली होती.

याबाबत 6 ऑक्टोबर 2019 रोजी राज्य शासनाने 0.90 टीएमसी पाण्याची तरतूद केल्याचा आदेश काढला. त्याला मान्यताही मिळाली. म्हणजेच, द्वितीय सुधारित प्रशासकीय अहवालानुसार 0.90 टीएमसी पाण्याची तरतूद कायम ठेवल्याचे दिसून येते. रखडलेल्या उपसा सिंचन योजनेसंदर्भात शासनाने एक परिपत्रक काढले. ज्यामध्ये सीना-माढा, दहिगाव, आष्टी शिरापूर, एकरुख यांसारख्या योजना कार्यान्वित होत आहेत. मात्र, पाणी वाटप लवादाप्रमाणे पाणी राखीव असूनही लाकडी-निंबोडी या योजनेला मुहूर्त का मिळत नाही?
उजनी जलाशयात दरवर्षी सुमारे 127 टीएमसी पाणी जमा होते. ते सर्व पाणी पुणे जिल्ह्यातून येते.

उजनी धरणात इंदापूर तालुक्यातील 40 हजार एकर जमीन पाण्यात बुडाली आहे. 31 गावांना कायमची जलसमाधी मिळाली आहे. एवढा त्याग इंदापूरकरांनी उजनी धरणासाठी केला आहे आणि आता केवळ एक टीएमसी पाण्यासाठी सोलापूरकर विरोध करतात, यामुळे इंदापूरचे धरणग्रस्त संतप्त झाले आहेत. सोलापूर शहराला पिण्यासाठी केवळ दोन टीएमसी पाण्याची गरज असताना भीमा नदीत मात्र दरवर्षी 20 टीएमसी पाणी सोडले जाते. अतिरिक्त अठरा टीएमसी पाणी वाया जाते. त्याचा काही विचार सोलापूरकर करणार आहेत की नाही, असा प्रश्न धरणग्रस्त विचारत आहेत.

20 टीएमसी पाणी सोडल्याने इंदापूर तालुक्यात जवळपास 12 हजार उपसा जलसिंचन योजना दोन-तीन महिने अडचणीत येतात. धरणग्रस्तांची उभी पिके जळून खाक होतात. त्याला जबाबदार कोण, याचे उत्तर सोलापूरकरांनी द्यावे. भविष्यात उजनी धरणातून मराठवाड्यासाठी 21 टीएमसी पाणी बारमाही जाणार आहे. त्याला मात्र सोलापूरकरांचा विरोध नाही. फक्त इंदापूरकरांच्या हक्काच्या पाण्याला सोलापूरकरांचा विरोध का, असा सवाल इंदापूरकर विचारत आहेत. सद्य:स्थितीला लाकडी-लिंबोडीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. या योजनेमुळे त्यांची तहान भागविण्यास मदत होणार आहे, हे सोलापूरकरांना समजत नाही.

18 टीएमसी पाण्यासाठी न्यायालयात जाणार

‘पाणी आमचं, जमीन आमची’ असतानादेखील हक्काच्या पाण्यासाठी जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली, तर वेळप्रसंगी त्याची तयारी इंदापूरकरांनी केली आहे. सोलापूरला पिण्यासाठी जाणारे पाणी बंद जलवाहिनीमधून घेऊन जावे व उजनीवरील 18 टीएमसी पाण्याचा होणारा अतिरिक्त वापर थांबवावा, यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे या वेळी उजनी धरणग्रस्तांनी सांगितले. लागणार

हेही वाचा :

Back to top button