सातारा : मान्सूनपूर्व सरींनंतर जिल्हा कूल | पुढारी

सातारा : मान्सूनपूर्व सरींनंतर जिल्हा कूल

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा शहरासह जिल्ह्याचा पारा गेल्या अडीच महिन्यांपासून सरासरी 35 ते 40 अंश या दरम्यान होता. त्यामुळे जिल्ह्यात सूर्य आग ओकतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. दि. 28 एप्रिल रोजी सातारा जिल्ह्याचा पारा उच्चांकी 41.2 अंशांवर गेला होता. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आले होते. मात्र, मान्सूनपूर्व पावसाने हवामानाचा नूरच पालटला आहे. त्यामुळे आता सातारा कूल कूल झाला आहे. आठवड्यात तापमानात तब्बल 7 अंशांची घट झाली आहे. यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच तीव्र उन्हाळा जाणवू लागला होता. शहर व परिसरात सकाळी 9 वाजल्यापासून उन्हाचा तडाखा वाढू लागला होता. जस जसे ऊन वाढत गेले तशी अंगाची लाही लाही होत होती. त्यामुळे वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण झाले होते. तीव्र उन्हामुळे दुपारच्यावेळी वर्दळीच्या रस्त्यावरही शुकशुकाट होता. बाजारपेठेतील व्यवहारही ठप्प झाले होते. तापमानाचा पारा वाढतच चालल्याने नागरिक चांगलेच घामाघूम झाले होते.

मात्र, गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पडल्या. यानंतर हवामानाने आपला नूर पालटला आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे सातारकर नागरिक पाऊस नसतानाही पावसाळी वातावरणाचा अनुभव घेत आहेत. जोरदार वार्‍यामुळे उष्मा कमी झाला आहे. पावसानंतर गत आठवडाभरात तापमानात 7 अंशांची घट झाली आहे.

सोमवारी सातारचा पारा 33.3 अंशांवर तर थंड हवेचे ठिकाण असणार्‍या महाबळेश्‍वरचा पारा 27.1 अंशांवर होता. रविवारी सातारा 33 तर महाबळेश्‍वर 25.7 अंश, दि. 21 रोजी सातारा 32.1 तर महाबळेश्‍वर 27, दि.20 रोजी सातारा 28.1 तर महाबळेश्‍वर 20.4, दि. 19 रोजी सातारा 35.5 तर महाबळेश्‍वर 27.1, दि. 18 रोजी सातारचा पारा 38.2 तर महाबळेश्‍वरचा 30.9 अंशांवर होता.

हेही वाचलत का ?

Back to top button