Russia : रशिया आता बनवणार अत्याधुनिक अंतराळयान | पुढारी

Russia : रशिया आता बनवणार अत्याधुनिक अंतराळयान

मॉस्को : रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला आता 50 दिवस झाले आहेत. या धामधुमीतच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या एका नव्या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. त्यांनी सांगितले की रशियन अंतराळ संस्थेने अंतरीक्षाच्या शोधामध्ये येणार्‍या आव्हानांचा सामना करण्याची गरज आहे. त्यासाठी रशिया अत्याधुनिक अंतराळयान आणि न्यूक्‍लिअर स्पेस टेक्नॉलॉजी विकसित करील. यावर्षीच्या अखेरपर्यंत रशिया चंद्रावर एक मानवरहीत यान सोडणार आहे.

‘लूना 25 मिशन’च्या लाँचची तारीख यापूर्वी 2016 होती. त्यानंतर ती 2018 आणि नंतर 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आली. आता ही मोहीम याचवर्षी पार पाडली जाणार आहे हे विशेष! काही दिवसांपूर्वीच रशियाने अमेरिकेसमवेतच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या उपक्रमातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. ‘नासा’ आणि युरोपियन स्पेस एजन्सीसमवेत आता यापुढे काम केले जाणार नाही, असे रशियाने स्पष्ट केले आहे.

‘आयएसएस’मधील 23 वर्षे जुनी भागिदारी संपुष्टात आणल्याची घोषणा रशियाने केली त्यावेळेपासूनच या अंतराळ स्थानकाच्या अस्तित्वावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. युक्रेनवरील हल्ल्यानंतर पाश्‍चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे रशियाने हे पाऊल उचलले आहे. अंतराळ स्थानकाला 2031 मध्ये निवृत्त करण्याची ‘नासा’ची योजना आहे. मात्र, रशियाने यामधील सहभाग काढून घेतल्याने ते मुदतीपूर्वीच पृथ्वीवरील समुद्रात क्रॅश केले जाऊ शकते.

हेही वाचलत का ?

Back to top button