बर्लिन :
'जगातील सर्वात वृद्ध गोरीला' अशी फाटोऊ नावाच्या मादी गोरीलाची ख्याती आहे. या गोरीलाने जर्मनीची राजधानी बर्लिनच्या प्राणीसंग्रहालयात आपला 65 वा वाढदिवस साजरा केला. कर्मचार्यांनी या गोरीलासाठी एक स्पेशल केक बनवला होता. त्यामध्ये तांदूळ, चीज, भाज्या आणि फळांचा वापर करण्यात आला. केकवर लाल आणि करड्या रंगाच्या कँडीने '65' असे लिहिले होते. हा केक फाटोऊने चवीने व बोटे चाटत खाल्ला!
प्राणीसंग्रहालयाने तिच्या वाढदिवसाचा हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये ही गोरीला मादी मिटक्या मारत आपल्या वाढदिवसाचा केक खात असताना दिसून येते. ही मादी 1959 मध्ये बर्लिनमध्ये आणण्यात आली होती व त्यावेळेपासून इथेच राहत आहे. जंगलात राहणार्या गोरीलांचे वय सरासरी 40 वर्षे असते. फाटोऊ आता जगातील सर्वाधिक वयाची गोरीला ठरलेली आहे. तिचा जन्म 1957 मध्ये झाला होता.
पश्चिम आफ्रिकेतील एका जंगलात ती वाढली आणि तिला एका खलाशाने फ्रान्सला आणले होेते. दोन वर्षांची असताना ती बर्लिन झूमध्ये आली आणि तिथेच राहिली. 2017 मध्ये साठ वर्षांच्या कोलो नावाच्या गोरीलाचा मृत्यू झाल्यानंतर फाटोऊ हीच जगातील सर्वात वृद्ध गोरीला बनली. वानरांमध्ये गोरीला हीच सर्वात मोठ्या आकाराची प्रजाती असते. त्यांचे वजन सुमारे 2 हजार किलो असते. ते रोज पंधरा ते वीस किलो पाने, गवत, साल आणि फळे खातात.