वॉशिंग्टन : हजारो-लाखो वर्षांपूर्वीच्या आदिमानवाची उंची सध्याच्या माणसाच्या तुलनेत अधिक होती. मात्र, त्यानंतर ती कमी का झाली याचे उत्तर अनेक वर्षे संशोधक शोधत होते. आता संशोधकांनी म्हटले आहे की आपल्या पूर्वजांनी शिकार करणे, भटके जीवन जगणे सोडून देऊन शेती करून एका जागी स्थिर होण्यास सुरुवात केल्यावर माणसाची उंची कमी होत गेली.
बारा हजार वर्षांपूर्वी माणसाची उंची सध्याच्या काळापेक्षा अधिक होती. मात्र, त्यानंतर शेती सुरू झाल्यावर ही उंची कमी होत गेली. या संशोधनासाठी युरोपमध्ये 167 प्राचीन लोकांच्या सांगाड्यांच्या डीएनएचे विश्लेषण करण्यात आले. त्यावेळी असे दिसून आले की शेतीमुळे माणसांची उंची 1.5 इंचाने कमी झाली. युरोपमध्ये बारा हजार वर्षांपूर्वी शेतीस सुरुवात झाली होती. शेतीच्या आधी माणूस शिकार करून उदरनिर्वाह करीत असे. शेतीनंतर त्याची जीवनशैली बदलून गेली व त्याचा परिणाम उंचीवर होत गेला.
तत्कालीन लोकांना पुरेसा पोषक आहार मिळत नव्हता असेही दिसून येते. त्यामुळेही उंचीवर परिणाम झाला. पेनसिल्वानियाच्या स्टेट कॉलेजमधील स्टेफनी मार्सिनियाक यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. प्राचीन माणसांच्या हाडांच्या मोजमापाबरोबरच त्यांनी जनुकीय संशोधनही केले. त्यांनी सांगितले की कृषी जीवनशैलीमध्ये परिवर्तन संपूर्ण युरोपात एकाचवेळी झाले नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळात झाले. ग्रीसमध्ये शेतीमुळे मानवी उंचीवर प्रभाव पडण्यास सुमारे 9 हजार वर्षांपूर्वी सुरुवात झाली. बि—टनमध्ये पुढील दोन हजार वर्षांपर्यंत मानवावर त्याचा परिणाम झाला नव्हता.