नाशिक : मनपा आयुक्तांचा सातपूरला अचानक पाहणी दौरा | पुढारी

नाशिक : मनपा आयुक्तांचा सातपूरला अचानक पाहणी दौरा

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
नवनियुक्त नाशिक मनपा आयुक्त रमेश पवार यांनी सोमवारी (दि.4) सकाळी अचानक सातपूर परिसरात पाहणी दौरा केला. पाहणी दौर्‍यामध्ये विविध ठिकाणी भेट देत असताना छत्रपती शिवाजी महाराज भाजीमंडई, नासर्डी नदी पूल, सातपूर गावठाण परिसर, प्रबुद्धनगर, शिवाजीनगर, अशोकनगर आदी भागांत मोठ्या प्रमाणात ब्लॅक स्पॉट, कचर्‍याचे ढिगारे दिसून आले.

परिसरातील नागरिकांनी घंटागाडी वेळेवर येत नसल्याचे गार्‍हाणे आयुक्तांसमोर मांडले. अमृत गार्डन ते मोतीवाला मेडिकल कॉलेजपर्यंतच्या रस्ता रुंदीकरण कामाची पाहणी केली. यावेळी आयुक्तांनी रस्ता रुंदीकरणाचे काम का पूर्ण केले जात नाही, याची माहिती संबंधित अधिकार्‍यांना विचारली.

तसेच चुंचाळे शिवारातील म्हाडाच्या सदनिकांना भेट देऊन तेथील वास्तव स्थिती जाणून घेतली. यावेळी आयुक्त रमेश पवार यांनी अधिकार्‍यांना या समस्या त्वरित सोडवण्याचे आदेश दिले. यावेळी उपआयुक्त करुणा डहाळे, कार्यकारी अभियंता पाटील, विभागीय अधिकारी नितीन नेर, स्वच्छता विभागाच्या माधुरी तांबे, तसेच कोल्हे, गायकवाड, अग्रवाल, तानाजी निगळ आदी अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button