सांगली : डासांचा उच्छाद; उद्रेकाची भीती | पुढारी

सांगली : डासांचा उच्छाद; उद्रेकाची भीती

सांगली : उध्दव पाटील

महानगरपालिका क्षेत्रात डासांचा उच्छाद वाढला आहे. नागरिक हैराण झाले आहेत. हिवाळा संपून उन्हाळा सुरू झाला आहे. सध्याचे वातावरण डासोत्पत्तीला पोषक आहे. डासांची उत्पत्ती आणि त्रास आणखी वाढणार आहे. डास प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे, अन्यथा डेंग्यू, चिकुनगुनिया, हिवताप यांच्या साथींचा उद्रेक होण्याची भीती आहे.

सांगलीत वाल्मिकी वसाहत, घन:शामनगर, अभिंनदन कॉलनी, संजयनगर, चिंतामणीनगर, सावंत प्लॉट, हनुमाननगर, इंदिरानगर झोपडपट्टी, गारपीर चौक, रमामातानगर, विनायकनगर, स्फूर्ती चौक, दत्तनगर, वारणाली विद्यानगर. मिरज शहरात गुरूवारपेठ, ख्वॉजा वस्ती स्टेशनमागे, समतानगर, विजयनगर, ईदगाहनगर, संजयनगर झोपडपट्टी, हडको कॉलनी, रमामाता उद्यान आणि कुपवाडमध्ये प्रकाशनगर, हडको कॉलनी, शिवनेरीनगर हे भाग संवेदनशील घोषित केले आहेत. मात्र, केवळ या भागातच नव्हे, तर संपूर्ण महापालिका क्षेत्रात आणि ग्रामीण भागातही डासांची संख्या आणि उच्छाद वाढला आहे.

एडिस एजिप्टाय डासाच्या पायावर, अंगावर पाढरे पट्टे असतात. हा डास दिवसा चालतो. या डासाची अळी पाण्यात स्प्रिंगप्रमाणे हालचाल करते. अ‍ॅनाफेलिस डासाची मादी स्वच्छ पाण्यावर अंडी घालते. हा डास पंचेचाळीस अंश कोनात (तिरका) बसतो. हिवतापाचा प्रसार होतो. क्युलेक्स डासाची मादी हत्ती रोगाचा प्रसार करते. हा डास कुबड काढून बसतो.

मोठे डास; संख्या मोठी, पण..!

एडिस एजिप्टाय, अ‍ॅनाफेलिस, क्युलेक्स या तीन प्रमुख तापदायक डासांपेक्षा इतरही विविध प्रजातीचे 57 प्रकारचे डास आहेत. आकाराने मोठे असणार्‍या इतर प्रजातीच्या डासांची संख्या मोठी आहे. या डासांपासून आजार पसरत नाही, असे सांगितले जाते.

स्वच्छ साचलेले पाणी, डबक्यांमध्ये साचलेले पाणी, टाक्या व बॅरलमध्ये साठवलेले पाणी, टायर्स, फ्रिज, कुलर, फुलदाणी, करवंटी, भंगार साहित्य, थंड अडगळीची जागा ही डासोत्पत्ती स्थाने आहेत. पाणीसाठवण्याची भांडी, टाक्या आठवड्यातून एकदा घासून पुसून स्वच्छ करणे, झाकण लावणे, घरावरील व परिसरात टायर, भंगारवस्तूमध्ये पाणी साठून डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेणे व अन्य उपाययोजना राबविणे गरजेचे आहेत. फ्रिजच्या ‘डिफ्रोस्ट’मधील पाणी हे डासांचे आवडते उत्पत्ती स्थान आहे. स्लॅबवरील पाणी सात-आठ दिवसांनी बदलणे गरजेचे आहे. उपाय योजनांसाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच नागरिकांचा सहभागही महत्त्वपूर्ण आहे.

एडिस, अ‍ॅनाफेलिसपेक्षा इतर डासांची संख्या जादा

डासांच्या विविध 60 प्रकारच्या प्रजाती आहेत. त्यातील एडिस एजिप्टाय डासाच्या मादीपासून डेंग्यू व चिकुनगुनिया, अ‍ॅनाफेलिस डासाच्या मादीपासून हिवताप, क्युलेक्स डासाच्या मादीपासून हत्तीपायरोग होतो. कारखान्यासमोरील लक्ष्मीनगर येथे काही घरांमध्ये दि. 20 जानेवारीला अ‍ॅनाफेलिस डासांच्या मादीची संख्या 6, एडिस एजिप्टाया डास 5, क्युलेक्स डास 10, इतर प्रजातीचे 16 डास आढळले.

डासअळी घनतेने धोकादायक पातळी ओलांडली

डासअळी घनता 5 टक्क्यांपेक्षा अधिक आढळली तर धोकादायक म्हटले जाते. सांगलीत कारखान्यासमोरील लक्ष्मीनगर येथे दि. 21 जानेवारीमध्ये डासअळी घनता 13.88 टक्के आढळली आहे. मिरजेत शनिवारपेठमध्ये 7.69 टक्के, सांगलीत इंदिरानगरमध्ये 8.82 टक्के इतकी आढळली.

Back to top button