युक्रेन युद्ध : इतिहासाची पुनरावृत्ती! | पुढारी

युक्रेन युद्ध : इतिहासाची पुनरावृत्ती!

फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. जवळजवळ वर्षभरापासून युद्धाचे ढग जमा होत होते. त्याला तोंड फुटले. तब्बल 85 वर्षांपूर्वी असेच रणनाट्य युरोपच्या भूमीवर घडले आणि दुसर्‍या महायुद्धाचा वणवा पेटला. सारे जग होरपळले. इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात. रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, युद्ध लादले. जर्मनीचा चॅन्सलर सर्वेसर्वा अ‍ॅडॉल्फ हिटलर याने अगदी अशीच खेळी केली होती. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन हिटलरच्याच पावलावर पाऊल टाकीत आहेत.

1933 मध्ये हेर हिटलर सत्तेवर आला. जर्मनीचा चॅन्सलर म्हणून त्याने सूत्रे हाती घेतली. पहिल्या महायुद्धात दारुण पराभव झालेल्या जर्मनीच्या नशिबी अपमानास्पद असा व्हर्सायचा तह आला होता. त्याने जर्मनीचे हातपाय बांधले गेले होते. सत्तेवर येताच हा तह ठोकरून लावण्याचा निर्धार हिटलरने केला आणि पद्धतशीरपणे पावले टाकली. 1935 ते 1938-39 पर्यंत हिटलरने उचललेल्या पावलांचे काही अंशी समर्थन होत असले, तरी नंतर त्याच्या विस्तारवादी युद्धपिपासू वृत्तीचे समर्थन होऊ शकत नाही.

जर्मनीचा सार हा छोटा प्रांत तहात गमावला होता. 1936 मध्ये हिटलरने आठ लाख वस्तीचा हा भाग जर्मनीत सामील करून घेतला. जर्मनी आणि फ्रान्स सीमेवरील र्‍हाईनलँड हा भाग युद्धबंदी क्षेत्र म्हणून तहातील कलम होते. हिटलरने ते धाब्यावर बसवले आणि जर्मनीचाच भाग असलेला र्‍हाईनलँड पुन्हा ताब्यात आणला. दोनच वर्षांत जर्मनबहुल असलेला ऑस्ट्रिया हिटलरने आपल्या अमलात आणला. ऑस्ट्रिया पूर्वी प्रशियन राजवटीचाच भाग होता. इथवर हिटलरला फ्रान्स अथवा ब्रिटनने फारसा विरोध केला नाही. मूळ जर्मनीचेच हे भाग होते आणि दोस्त राष्ट्रांनी ते व्हर्साय तहाने जर्मनीपासून अलग केले होते.

हिटलरची नजर यानंतर झेकोस्लोव्हाकियावर पडली. सुडेटनलँड हा जर्मन बहुसंख्याक भाग. तो जर्मनीला मिळावा, यासाठी हिटलरचा हट्ट. हिटलरच्या हस्तकांनी सुडेटनलँडमध्ये यादवी सुरू केलीच होती. तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान चेंबरलेन आणि फ्रान्सचा पंतप्रधान दलादिए यांनी म्युनिच शांतता करार घडवला आणि हिटलर शांत होईल, अशी अपेक्षा केली. तथापि, वर्षभरातच हा करार गुंडाळून हिटलरने एक सप्टेंबर 1939 रोजी पोलंडवर वायुवेगाने आक्रमण केले आणि दुसर्‍या महायुद्धाचा बिगुल वाजला.

दुसर्‍या महायुद्धापूर्वी हिटलरने जशा चाली रचल्या, तशाच चाली पुतीन यांनी रचल्याचे सकृतदर्शनी दिसते. 1954 मध्ये रशियाने स्वतःहून क्रिमिया प्रांत युक्रेनला दिला होता. वास्तविक क्रिमियावर 200 वर्षांपासून रशियाचा प्रभाव आहे. क्रिमियात 58 टक्के लोक रशियन आहेत. क्रिमियात सार्वमत घेण्यात आले तेव्हा 97 टक्के लोकांनी रशियात विलीन होण्याच्या बाजूने कौल दिला. क्रिमियामुळे रशियाला कॅस्पियन समुद्रातून जलवाहतुकीची आणि व्यापार विस्ताराची सुविधा मिळाली आहे.

युक्रेनपासून क्रिमिया रशियाने आपल्या कब्जात आणला. अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियाच्या या कृतीबद्दल खळखळ केली आणि आर्थिक निर्बंध लादले, तरी पुतीन डगमगले नाहीत. युक्रेनपासून क्रिमिया तोडून पुतीन यांनी आपला इरादा स्पष्ट केला होता. सुडेटनलँड आणि पोलंडमधील डॅन्झिग बंदराचे कारण पुढे करत हिटलरने आपल्या चाली रचल्या होत्या.

ऑस्ट्रिया, झेकोस्लोव्हाकिया आदी देशांत हिटलरने आपल्या हस्तकांचे जाळे पसरले होते. एकेकाळी केजीबी या रशियाच्या बलाढ्य गुप्तहेर संस्थेत 1975 ते 1991 अशी 16 वर्षे अधिकारपदावर असलेल्या पुतीन यांनी रशियात क्रिमियाचे विलीनीकरण घडविताना हिटलरचाच कित्ता गिरवला असल्यास आश्चर्य वाटायला नको.

आता रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे आणि राजधानी कीव्हमध्ये मुसंडी मारली आहे. युक्रेनच्या पाचपट क्षेत्रफळ असणार्‍या रशियाची आणि युक्रेनची कोणत्याही बाबतीत तुलनाच होऊ शकत नाही. रशियाचे सैन्यदल जगातील तिसर्‍या क्रमांकाचे आहे. युक्रेनकडे त्या तुलनेत पाचव्या हिश्श्यानेही सैन्य नाही. रशियाचा सेना दलावरील खर्च 6200 कोटी डॉलर, तर युक्रेनचा अवघा 54 कोटी डॉलर आहे. रशियाकडे 1600 अण्वस्त्रे क्रियाशील स्थितीत आहेत. युक्रेनकडे त्याची वानवा आहे. मनुष्यबळ आणि साधनसामग्री याबाबत युक्रेन रशियाच्या जवळपासही येऊ शकणार नाही.

युक्रेन ‘नाटो’ या युरोपियन राष्ट्रांच्या आणि अमेरिकेच्या तालावर नाचणार्‍या लष्करी संघटनेत सामील होऊ नये, युक्रेनमार्गे जर्मनीसह अन्य देशांत व्यापार वाढीचा मार्ग मोकळा व्हावा, अशा विविध उद्देशाने पुतीन यांनी आक्रमक चाल रचली आहे. युक्रेन ‘नाटो’त सामील झाल्यास रशियाभोवती वेढा पडतो, ही पुतीन यांची भीती. ती अगदीच अनाठायी म्हणता येणार नाही.

अमेरिका लष्करी कारवाईचा पर्याय स्वीकारण्याच्या मनःस्थितीत नाही व नाटो संघटना किती ताकदीने या संघर्षात उतरते, यावर या संघर्षाची व्याप्ती अवलंबून आहे. युक्रेन ‘नाटो’चा अधिकृत सदस्य नाही. त्यामुळे युक्रेनला थेट लष्करी मदत कशी करायची हा ‘नाटो’पुढे पेच आहे. युक्रेनचे तीन तुकडे करून पुतीन यांनी आपले पहिले उद्दिष्ट साध्य केले आहे. यामुळे हा संघर्ष किती टोकाला जाणार हे जागतिक दडपण कितपत वाढेल, यावर अवलंबून आहे.

असे असले तरी रशियातील सर्वशक्तिमान पुतीन यांच्या विरोधात युक्रेन कारवाईबाबत निषेध व्यक्त करणारी आणि त्यांना हिटलर म्हणून संबोधणारी आंदोलने झाली आणि होत आहेत, याचीही दखल घ्यायला हवी. पुतीन हिटलरचेच अनुकरण करीत आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. सार प्रांत ते ऑस्ट्रिया, झेकोस्लोव्हाकिया घशात घालूनही हिटलरची भूक भागली नाही. पोलंडवर आक्रमण करून हिटलरने आपली राक्षसी महत्त्वाकांक्षा प्रकट केली. जगाला युद्धाच्या खाईत ढकलले. युक्रेननंतर पुतीन यांचा डोळा कोणावर, याची चर्चा सुरू झाली आहे. आता पुतीन किती टोकाला जातात, हे पाहावयाचे!…

सुरेश पवार

Back to top button