चिनी रोव्हरला चंद्रावर दिसल्या दोन वर्तुळाकार काचा ! | पुढारी

चिनी रोव्हरला चंद्रावर दिसल्या दोन वर्तुळाकार काचा !

बीजिंग ः चीनच्या ‘युतु-2’ रोव्हरने चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणार्‍या भागात दोन वर्तुळाकार काचा पाहिल्या आहेत. मोत्यासारख्या चमकणार्‍या या काचा तेथील कोरड्या आणि धुळीच्या भूप्रदेशात उठून दिसणार्‍या आहेत. आता या काचांची निर्मिती कशी झाली याबाबतचे संशोधन सुरू आहे.

यापूर्वीही चांद्रभूमीवर काच आढळली होती. ‘नासा’च्या ‘अपोलो-16’ मोहिमेवेळी अशी काच दिसून आली होती व आता ‘युतु-2’ रोव्हरलाही काच दिसली आहे. सिलिकॉनने संपन्न असलेल्या पायरॉक्सिन आणि फेल्डस्पारसारख्या खनिजांमुळे अशी काच बनते. ही खनिजे अतिशय वेगाने उष्ण होऊ शकतात. मात्र, यावेळी प्रथमच गोलाकार काच आढळली आहे. या गोलाकार काचेचा नेमका स्रोत समजू शकलेला नाही.

कदाचित तेथील ज्वालामुखीच्या उद्रेकातून अशा गोलाकार वस्तू बाहेर पडलेल्या असाव्यात असे संशोधकांना वाटते. एखाद्या उल्केच्या वेगवान धडकेचाही हा परिणाम असू शकतो. ‘सायन्स बुलेटिन’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. चीनच्या सन यात्सेन युनिव्हर्सिटीतील झियोंग झियाओ या प्लॅनेटरी जिऑलॉजिस्टने याबाबतची माहिती दिली.

 

Back to top button