

पुढारी ऑनलाईन – वेलनेस थेरपिस्ट असल्याचे भासवून एका महिलेने पुरुषाला ३ लाख रुपयांना टोपी घातली आहे. या पुरुषाची या महिलेसोबत Tinder या डेटिंग अॅपवर ओळख झाली होती. या प्रकरणात महिलेविरोधात खटला चालवण्याचे आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती एम. नागाप्रसन्न यांनी या संदर्भात निकाल दिला आहे. (Tinder match gone wrong)
असा खटला चालवता येणार नाही, अशी याचिका या महिलेने दाखल केली होती. ही याचिका न्यायमूर्तींनी फेटाळून लावली. "कोणतीही शैक्षणिक पात्रता नसताना आणि कोणतीही टीम नसताना या महिलेने सोशल मीडिया पेजवर स्वतःची ओळख वेलनेस थेरपिस्ट अशी दाखवली होती. त्यामुळे फसवणुकीचा प्रकार घडला आहे, हे प्रथमदर्शनी दिसून येते," असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.
या प्रकरणातील पुरुष आणि महिला यांची ओळख Tinder या डेटिंग अॅपवर झाली होती. या पुरुषाने एका महिलेला एकदा थकवा आल्याचे सांगितले. या महिलने या पुरुषाला तिच्या इन्स्टाग्राम पेजची माहिती दिली तसेच आपण वेलनेस थेरपिस्ट असल्याचे सांगितले आणि त्यासाठीचे अभ्यासक्रम घेतो, असेही सांगितले. त्यानंतर संपूर्ण कोव्हिडमधील लॉकडाऊनच्या काळात या पुरुषाने विविध अभ्यासक्रम पूर्ण केले आणि त्याबदल्यात ३.१५ लाख रुपये देऊ केले.
पण नंतर प्रत्यक्ष भेटण्याची विनंती मात्र या महिलेने मान्य केली नाही. तसेच तिने पुरुषाला व्हॉटसअपवर ब्लॉकही केले. त्यानंतर जेव्हा या पुरुषाने माहिती घेण्यास सुरुवात केली त्यावेळी या महिलेचे १५ सोशल मीडिया पेज असल्याचे दिसले. त्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी या महिलेविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तर संबंधित महिलने या पुरुषाने अश्लिल मेसेज पाठवल्याचे उच्च न्यायालयातील याचिकेत म्हटले आहे. या महिलेचा असा दावा आहे की या पुरुषाने क्लासला हजेरी लावली, आणि त्यातून समाधान झाल्यानेच फी दिलेली आहे, त्यामुळे कोणताही फसवणूक झालेली नाही.
उच्च न्यायालयाने महिलेची ही याचिका फेटाळून लावली. तसेच अश्लिल मेसेज पाठवणे या स्वंतत्र गुन्हा असल्याचे सांगत यावरील निर्णय प्रलंबित ठेवला आहे.
हेही वाचा