UN slams Twitter : ट्विटरकडून पत्रकारांची ट्विटर अकाऊंट बंद; संयुक्त राष्ट्रसंघाने एलन मस्क यांना फटकारले | पुढारी

UN slams Twitter : ट्विटरकडून पत्रकारांची ट्विटर अकाऊंट बंद; संयुक्त राष्ट्रसंघाने एलन मस्क यांना फटकारले

पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्विटर हाती आल्यापासून ट्विटरचे मालक एलन मस्क हे त्यांच्या वादग्रस्त निर्णयांमुळे सतत चर्चेत आहेत. मस्क यांनी नुकतेच ट्विटर या मायक्रो-ब्लॉगिंग साइटवरून काही पत्रकारांची ट्विटर अकाऊंट निलंबित केली आहेत. मस्क यांच्या या निर्णयाचा संयुक्त राष्ट्रांचे (यूएन) सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी निषेध केला आहे. तसेच त्यांनी हे धोकादायक उदाहरण असल्याचे म्हणत ट्विटरला फटकारले आहे.

संयुक्त राष्ट्र महासचिवांचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक यांनी म्हटले आहे की, ट्विटरवरून पत्रकारांची खाती काढून टाकणे हे एक धोकादायक उदाहरण आहे. या मनमानी निलंबनामुळे यूएनचे सरचिटणीस अतिशय व्यथित झाले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दावा करणाऱ्या व्यासपीठावर माध्यमांचा आवाज बंद होता कामा नये, असेही त्यांनी म्हटले आहे. ट्विटरने अशावेळी हे पाऊल उचलले आहे जेव्हा जगभरातील पत्रकार सेन्सॉरशिप, जीवाला असणारा धोका आणि इतर वाईट परिस्थितीचा सामना करत आहे.

का केली पत्रकारांची ट्विटर अकाऊंट बंद

ट्विटरने सुमारे अर्धा डझनहून अधिक प्रसिद्ध पत्रकारांची खाती निलंबित केली आहेत. दरम्यान मस्क यांनी आरोप केला आहे की, त्यांनी ट्विटरच्या ‘डॉक्सिंग’ नियमांविरुद्ध काम केले आहे. ज्या पत्रकारांची खाती निलंबित करण्यात आली आहेत त्यात न्यूयॉर्क टाइम्सचे रायन मॅक, सीएनएनचे डॉनी ओ’सुलिव्हन, द वॉशिंग्टन पोस्टचे ड्र्यू हार्वेल, मॅशबलचे मॅट बाइंडर, द इंटरसेप्टचे मिका ली, राजकीय रिपोर्टर कीथ ओल्बरमन आणि फ्रीलान्स रिपोर्टर आरोन रुपर आणि टोनी वेबस्टर यांचा समावेश आहे. ट्विटरने या पत्रकारांच्या ट्विटर अकाऊंटवर ‘खाते निलंबित’ची नोटीस प्रदर्शित केली आहे.

UN ट्विटरच्या निर्णयांवर लक्ष ठेवून

संयुक्त राष्ट्र महासचिवांच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही ट्विटरच्या दैनंदिन निर्णय आणि बदलांवर लक्ष ठेवून आहोत. सोशल मीडियाच्या क्षेत्रात ट्विटरचा प्रभाव असल्याने, माहिती आणि वस्तुस्थितीची माहिती शेअर करण्यासाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. परंतु सध्या या सोशल माध्यमावर द्वेषयुक्त भाषा आणि चुकीच्या माहितीचे प्रमाण वाढले असून हे चिंताजनक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

Back to top button