UN महासभेत फ्रान्स राष्ट्राध्यक्षांकडून पीएम मोदींचे कौतुक तर रशियावर जोरदार प्रहार, वाचा काय म्हणाले? | पुढारी

UN महासभेत फ्रान्स राष्ट्राध्यक्षांकडून पीएम मोदींचे कौतुक तर रशियावर जोरदार प्रहार, वाचा काय म्हणाले?

संयुक्त राष्ट्रसंघ : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (French President Emanuel Macron) यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत (United Nations General Assembly) जगातील नेत्यांना संबोधित करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे कौतुक केले आहे. तर रशियावर जोरदार हल्लाबोल केला. रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना सांगितले होते की ही युद्धाची वेळ नाही आणि ही त्यांची भूमिका बरोबर होती.

उझबेकिस्तानच्या समरकंद येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या २२ व्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदी यांनी पुतीन यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान मोदींनी पुतीन यांना “आजचे युग युद्धाचे नाही” असे सांगितले होते. गेल्या सहा महिन्यांत पंतप्रधान मोदी यांचे पुतीन यांच्याशी या विषयावर अनेकवेळा फोनवर बोलणे झाले. मोदी यांनी लोकशाही, मुत्सद्दीपणा आणि संवादाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

“भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका बरोबर होती जेव्हा ते म्हणाले होते की ही वेळ युद्धाची नाही. ही वेळ पाश्चिमात्य देशांशी सूड उगवण्याची नाही. सर्वांनी आपल्यासमोर असलेल्या आव्हानांचा एकत्रितपणे सामना करण्याची हीच वेळ आहे.” असे मॅक्रॉन यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७७ व्या सत्रात बोलताना म्हटले.

मॅक्रॉन यांनी युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याचा निषेध करण्याबाबत तटस्थ न राहण्याचा सल्लाही जगातील राष्ट्रांना दिला आहे. रशियाचे आक्रमण हे साम्राज्यवादाचे नवीन स्वरूप असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. मॅक्रॉन यांनी आपल्या ३० मिनिटांच्या भाषणात म्हटले आहे की, “जे आज मौन बाळगून आहेत ते एकप्रकारे स्वत: किंवा गुप्तपणे एखाद्या विशिष्ट गुंतागुतीसह नवीन साम्राज्यवादाचे समर्थन करत आहेत. साम्राज्यवादाचे हे नवीन स्वरूप जागतिक व्यवस्थेचा नाश करत आहे.”

“जेव्हा मी रशिया हे नव्या सहकार्यासाठी आणि वर्चस्वाविना एका नवीन आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी तयार आहे असे म्हणताना ऐकतो, तेव्हा ती एक मोठी गोष्ट आहे. तुम्ही हे कशाच्या आधारावर म्हणता?. शेजाऱ्यावर आक्रमण करणे आणि तुम्ही सीमांचा आदर राखत नसाल तर हा काय आदेश आहे? आज कोण वर्चस्ववादी आहे? ” असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणातून रशियावर जोरदार शाब्दिक प्रहार केले. आम्ही प्रत्येकजण शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत, असेही त्यांनी पुढे म्हटले.

“जे शांततेसाठी, राज्यांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी लढले. ते आज मौन बाळगून आहेत. ते सध्याच्या व्यवस्थेला पायदळी तुडवत आहे आणि येथे आता शांतता निर्माण होणे शक्य नाही.” अशी खंत मॅक्रॉन यांनी व्यक्त केली.

उत्तर आणि दक्षिण दरम्यान एक नवीन करार करण्याची तातडीची गरज आहे. हा एक प्रभावी करार असून जो अन्नधान्य, जैवविविधतेसाठी, शिक्षणासाठी महत्वाचा आहे. ही वेळ आता ब्लॉक थिंकिंगची नाही तर कायदेशीर हितसंबंध आणि सामान्य वस्तूंचा ताळमेळ साधून विशिष्ट कृती करण्यासाठी एकत्र येण्याची आहे, असा सूर त्यांनी जागतिक नेत्यांसमोर व्यक्त केला.

हे ही वाचा :

Back to top button