न्यूयॉर्क : वृत्तसंस्था : United Nations गेल्या दोन वर्षांपासून भारतात कोरोना मुक्काम ठोकून आहे. पहिल्या लाटेत भारताला मोठा आर्थिक फटका बसला. लॉकडाऊनमुळे सारे व्यवहार ठप्प झाल्याने अर्थव्यवस्था खालावली. नंतर पुन्हा डेल्टा व्हेरियंटने घाला घातला. आता ओमायक्रॉनमुळे पुन्हा आर्थिक संकट भारतावर येऊ शकते, अशी शक्यता संयुक्त राष्ट्राच्या अर्थविषयक अंदाज समितीने व्यक्त केली आहे.
पहिल्या लाटेतील फटका भरून काढण्याचा भारताचा प्रयत्न डेल्टाने अडचणीत आणला. पुन्हा अर्थव्यवस्था काहीशी सावरू लागताच ओमायक्रॉन आणि तिसर्या लाटेचे संकट भारतासमोर आहे. निर्यातवाढ, वाढलेल्या गुंतवणुकीमुळे काहीसा फायदा होईल.
कच्च्या तेलातील दरवाढ आणि कोळशाच्या टंचाईमुळे मात्र आगामी काळात अर्थव्यवस्थेची गती मंदावणे शक्य आहे. खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे त्यामुळे आवश्यक ठरेल, असा उपायही या समितीने सुचविला आहे.
भारताची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याचा वेग मात्र नक्कीच उत्तम असल्याचा शेराही, अर्थविषयक अंदाज समितीने मारला आहे. वेगवान लसीकरण, सौम्य निर्बंध आणि त्याला अनुसरून अर्थविषयक धोरण यामुळे भारताचा जीडीपी 6.7 टक्क्यांनी वाढू शकतो, असे आश्वस्त करणारे विधानही समितीने केले आहे.
नवी दिल्ली : कोरोनामुळे मृत्युमुखी पडणार्यांपैकी 75 टक्के रुग्णांनी प्रतिबंधक लस घेतलेली नव्हती, असे मत दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी व्यक्त केले. 9 जानेवारी ते 12 जानेवारीदरम्यान दिल्लीत 97 रुग्ण मरण पावले. यातील 70 जणांनी लस घेतलेली नव्हती. 19 जणांनी एकच डोस घेतला होता, तर 8 जणांनी दोन्ही डोस घेतले होते, असेही त्यांनी सांगितले. दिल्लीत रुग्णसंख्या सध्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. संक्रमण दरही वाढलेला आहे.