

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सरकारी शाळांचे होणारे खासगीकरण थांबवावे आणि शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे बंद करून शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांना शिकवू द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने दि. 2 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चे काढण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली आहे.
राज्य शासनाकडून जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकांच्या शाळा विविध कंपन्यांना दत्तक देऊन भविष्यात त्या शाळा त्या कंपनीच्या मालकीच्या करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे भविष्यात सर्वसामान्य जनतेच्या मुलांना शिक्षण मिळणे अवघड होणार आहे. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना विविध अशैक्षणिक कामे लावून त्यांना त्यांच्या मूळ अध्यापनाच्या कामापासून दूर ठेवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करून पुन्हा गुणवत्तेबाबत ओरड केली जात आहे.
ग्रामीण व शहरी भागातील सरकारी शाळेतील शिक्षकांना 75 पेक्षा जास्त अशैक्षणिक कामांमुळे सर्व जण त्रासून गेले आहेत. याचा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अध्यापनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. या सर्व अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करावे आणि पूर्ण वेळ अध्यापन करू द्यावे, तसेच कंपन्यांमार्फत कंत्राटी नोकरभरती करू नये, यासाठी दि. 2 ऑक्टोबरला राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चे काढून असंतोष व्यक्त करण्यात येणार आहे.
यापूर्वी 5 सप्टेंबर शिक्षक दिनी सर्व शिक्षकांनी शाळेत काळ्या फिती लावून कामकाज करून निषेध केला होता. तरीदेखील शासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे दि.2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे तांबारे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा