सीओईपीकडून प्राध्यापकांचे मानधन देण्यास टाळाटाळ

सीओईपीकडून प्राध्यापकांचे मानधन देण्यास टाळाटाळ

पुणे : नुकताच तंत्रज्ञान विद्यापीठाचा दर्जा मिळालेल्या सीओईपी अर्थात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे या संस्थेने गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रेल अ‍ॅण्ड मेट्रो टेक्नॉलॉजी अर्थात पीजीडीआरएमटी हा अभ्यासक्रम अचानक बंद केला, शिवाय संबंधित अभ्यासक्रम शिकवणार्‍या प्राध्यापकांचे साडेसहा लाख रुपयांपेक्षा अधिक मानधन देण्यास आता टाळाटाळ केली जात आहे. मानधनासाठी वारंवार पाठपुरावा करूनही मानधन दिले जात नसल्याचा आरोप संबंधित प्राध्यापकांनी केला आहे.

प्राध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने सरकारी रेल्वेबरोबरच खासगी भागीदारीच्या माध्यमातून मेट्रो रेल्वेचे जाळे तयार करण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मागणी वाढली आहे. याचाच विचार करून एक वर्षाचा पूर्णवेळ अभ्यासक्रम सीओईपीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागामार्फत गेल्या चार वर्षांपासून राबविण्यात येत होता. परंतु पुरेसे विद्यार्थी अभ्यासक्रमाला नसल्याचे कारण देत सीओईपी प्रशासनाने गेल्या वर्षी अभ्यासक्रम बंद केला आहे. हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी जे प्राध्यापक नियुक्त करण्यात आले होते. त्यांना क्रेडिटनुसार मानधन देण्याचे निश्चित केले होते. परंतु, ते अद्यापही देण्यात आलेले नाही.

पीजीडीआरएमटी अभ्यासक्रमाच्या विविध विषयांसाठी प्रा. दिलीप भट, प्रा. उदय सांबरे, प्रा. अरविंद गोंदकर, प्रा. यू. एम. भागवत, प्रा. एम. एस. रणदिवे आदी वरिष्ठ आणि तज्ज्ञ प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आली होती. अभ्यासक्रम बंद करत असताना शेवटच्या वर्षात विभागप्रमुख डॉ. डावरी यांनी या प्राध्यापकांची नेमणूक करण्यात यावी आणि नेमणूकपत्र देण्यात यावे, अशी शिफारस जुलै आणि सप्टेंबर 2022 मध्ये लिखित स्वरूपात संस्थेचे संचालक आणि उपसंचालक यांच्याकडे केली होती. यावर संस्थेने काहीही कार्यवाही केली नाही.

तरीसुद्धा प्राध्यापकांनी विनातक्रार ज्ञानदानाचे कार्य चालूच ठेवले आणि परीक्षा घेऊन निकाल जाहीर होईपर्यंत कार्य केले. यामध्ये विशेष म्हणजे प्रा. भागवत यांच्या नेमणूकपत्राचा दिनांक 15 फेब—ुवारी 2023 आहे आणि कार्यकाल 2022 मधील जून ते सप्टेंबर असल्याचे उघडकीस आले आहे. परंतु, आता मानधनाची मागणी केल्यानंतर प्राध्यापकांना हजेरीपत्रक, काय शिकवले याचा अहवाल यासह अन्य बाबींची मागणी करून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे प्राध्यापकांनी सांगितले. त्यामुळे अभ्यासक्रम संस्थेने बंद केला हा त्यांचा निर्णय आहे. परंतु, नियमानुसार आमचे मानधन आहे ते कोणतेही आढेवेढे न घेता तातडीने द्यावे, अशी मागणी संबंधित प्राध्यापकांनी केली आहे.

सीओईपी संस्था मानधन देण्यास तयार आहे. परंतु त्यासाठी प्राध्यापकांनी जे लेक्चर घेतलेले आहे त्याची माहिती आणि मुलांचे हजेरीपत्रक सादर करावे. यासाठी त्यांना तीन वेळा
ई-मेलद्वारे माहिती मागवली आहे; परंतु त्यांनी ती माहिती आजतागायत सादर केलेली नाही. त्यामुळे त्यांचे मानधन संस्थेने दिलेले नाही.

– डॉ. डी. एन. सोनवणे, कुलसचिव, सीओईपी
तंत्रज्ञान विद्यापीठ.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news