Pune News : ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईच्या झळा | पुढारी

Pune News : ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईच्या झळा

पुणे : पुणे विभागात पाणीटंचाई तीव्र असून, साडेतीन लाख नागरिक आणि सव्वालाख जनावरांना 200 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्यात 31 मे रोजी पुणे विभागात केवळ 54 टँकर सुरू होते; परंतु सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने टँकरची संख्या चारपटीने वाढली आहे. यंदा मोसमी पाऊस विलंबाने सक्रिय झाला. जूनच्या शेवटच्या आठवड्यात दमदार हजेरी लावणार्‍या पावसाने जुलै महिन्यात दडी मारली. त्यानंतर काही प्रमाणात पाऊस झाला.

मात्र, तो सरासरीपेक्षा कमी असून, पावसावर अवलंबून असलेली खरिपातील पिके पूर्णपणे वाया गेली. तर दुसरीकडे पाणीटंचाई तीव्र होत असल्याचे विभागीय आयुक्तांकडून राज्य शासनाना टँकर संदर्भात सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे. पुणे विभागातील कोल्हापूर वगळता उर्वरित पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांतील 175 गावांतील तब्बल तीन लाख 53 हजार 666 नागरिक आणि सुमारे एक लाख 27 हजार 353 जनावरांना टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे.

सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र होत असून, 31 मे रोजी 16 गावे 50 वाड्यांतील साडेअठरा हजार नागरिक आणि साडेतीन हजार जनावरांना 15 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. तर आजच्या तारखेत 97 गावे आणि 437 वाड्यांतील एक लाख 37 हजार 808 नागरिक आणि 86 हजार 617 जनावरांना तब्बल 97 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 31 मे रोजी सांगली जिल्ह्यात केवळ टँकर सुरू होता. मात्र, आजच्या तारखेला 37 टँकरद्वारे 78 हजार 521 नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. तर 31 मे रोजी सोलापूर जिल्ह्यात एकही टँकर सुरू नव्हता. मात्र, आज 15 टँकरद्वारे 14 गावे आणि 121 वाड्यांतील 26 हजार नागरिक आणि 30 हजार जनावरांना पाणी पुरविले जात आहे.

पुणे जिल्ह्यात टँकरचे अर्धशतक

पुणे जिल्ह्यातही 51 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 39 गावे आणि 289 वाड्यांतील एक लाख 11 हजार नागरिकांची तहान टँकरवर अवलंबून आहे. आंबेगाव तालुक्यातील 7 गावे आणि 44 वाड्यांतील 23 हजार 62 नागरिकांना 9 टँकरच्या मदतीने पाणी पुरविले जात आहे. जुन्नरमधील 5 गावे आणि 58 वाड्यातील 16 हजार 118 नागरिकांसाठी 10 टँकर सुुरू आहेत. खेडमध्ये आठ टँकरद्वारे 11 आणि 62 वाड्यांतील 16 हजार 387 नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. पुरंदरमधील 10 गावे 60 वाड्यांतील 22 हजार नागरिकांसाठी 10 टँकर सुरू आहेत, तर शिरूर तालुक्यातील 6 गावे आणि 64 वाड्यांतील सुमारे 34 हजार नागरिकांना 13 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

हेही वाचा

कर्जत तालुक्यात 35 टँकरद्वारे पाणीपुरवठा

‘लिज्जत पापड’च्या सहसंस्थापिका जसवंतीबेन पोपट यांचे निधन

Goa Ganeshotsav : बांबूच्या किसुळीपासून बनला बाप्पा

Back to top button