

पुणे : अजित पवार आणि शरद पवार या काका-पुतण्यातील राज्यातील संघर्षाचे मुख्य रणांगण ही पुण्याची भूमी राहणार आहे. पवार घराण्याच्या 'होम ग्राऊंड' वर प्रथमच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. अनेकांना एकमेकांशी झुंजवणारे पवार आता आपल्याच घरातील संघर्षात कसे लढतात, याकडेही जिल्ह्याचे लक्ष आहे. पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत अतिशय नेटाने हा संघर्ष आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात आताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार विरुद्ध शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांची लढत होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.
संबंधित बातम्या :
१९९० ते २०२३ या काळात अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसवर आपली पोलादी पकड निर्माण केलेली आहे. अजित पवार यांची ही पकड सहजासहजी मोडून काढणे शरद पवार यांना शक्य नसले, तरी अजित पवार यांच्याशी झुंज करता येऊ शकेल, अशी तयारी करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळे यांचे गणित मात्र अजित पवार सोडून गेल्याने पूर्णपणे चुकले आहे. गेल्या वेळी शरद पवार यांनी लक्ष न घातल्याने अजित पवार यांचे चिरंजिव पार्थ यांचा मावळमधून लोकसभेला पराभव झाल्याची दबक्या आवाजातील चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे. त्यासाठी आता सुप्रिया सुळे यांचे चुकलेले गणित पूर्णपणे विघडविण्यासाठी पार्थ यांनाच त्यांच्यासमोर बारामती लोकसभा मतदारसंघात उरविले जाणार असल्याचीही चर्चा आहे.
पुणे जिल्हा बँक, पुणे जिल्हा दूध संघ, बारामती दूध संघ या महत्त्वाच्या संस्थांबरोबरच विसर्जित जिल्हा परिषद आणि बहुसंख्य तालुक्यांतील पंचायत समित्या, नगरपालिकांमध्ये अजित पवार यांचेच वर्चस्व आहे. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या १ आमदारांपैकी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार हे एकमेव आता तरी शरद पवार यांच्या पाठीशी आहे, तर जुन्नरचे आमदार अतुल बेनके तटस्थ आहेत. जिल्ह्यातील बहुसंख्य तालुक्यांतील राष्ट्रवादीचे स्थानिक शिलेदार अजित पवारांच्या गोटात गेलेले दिसतात.
बारामती लोकसभा मतदारसंघात त्यामुळे शरद पवार यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे यांचीही मोठी कोंडी झाली असून, याची खंत त्यांनी लोकसभेतही बोलून दाखविली आहे. अजित पवार यांच्यामुळे दूर गेलेले कार्येकर्ते, शरद पवार यांच्याबरोबर काम केलेल्या जुन्या निष्ठावान घराण्यातील नवी पिढी, अजित पवार यांच्याकडे आपले काही भवितव्य नाही, असे वाटणारे यांना घेऊन शरद पवार यांनी आपली फळी बांधण्यास सुरुवात केली आहे.
अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात शरद पवारांवर मात केल्याचे चित्र समोर येत असले, तरी शरद पवार यांचा नाद कोणी करायचा नाही, अशीही चर्चा नेहमीप्रमाणे रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्ह या संदर्भातही निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, यावरही अनेक बाबी अवलंबून आहेत. आगामी निवडणुकांत पक्ष कोणाचा असेल, एबी फॉर्म कोण देणार, यावरही अनेक कार्यकर्त्यांची गणिते ठरण्याची शक्यता आहे. काका-पुतणे कधीही एक होऊन आपला पोपट होऊ शकतो, अशी भीती वाटणारे अजूनही कुंपणावर आहेत.
हेही वाचा