

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मुंबईवरून पुण्याला निघालेल्या डेक्कन क्विन एक्सप्रेसमध्ये शनिवारी (दि. 23) सायंकाळी कर्जत-लोणावळा स्थानकादरम्यान एका 70 वर्षीय वयोवृद्ध पासधारकाचा तीव्र ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. धावत्या रेल्वेत ही घटना घडली. पिंपरी-चिंचवडसह पुणे शहरातील हजारो नागरिक रोजीरोटीच्या निमित्ताने पुणे-मुंबई असा प्रवास करतात. डेक्कन क्विन, सिंहगड आणि प्रगती आदी गाड्यांना पासधारकांसह इतर प्रवाशांची मोठी गर्दी असते.
बर्याचदा गाडीत चढण्यावरून आणि जागेवरून मारहाणीच्या तर अपघाताच्या घटना सतत घडतात. त्यामुळे पुणे-मुंबई मार्गावर
धावणार्या रेल्वेमधील घटना नेहमी चर्चेत असतात. मात्र, शनिवारी रेल्वेमध्ये झालेल्या वयोवृध्द पासधारकाच्या मृत्युमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. ही घटना मुंबई डिव्हिजनमध्ये घडल्याने याबाबत सविस्तर माहिती हाती आली नाही. डी-7 या रेल्वे डब्यात ही घटना घडली. या डब्यासाठी टीसी नेमण्यात आलाच नव्हता, अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून हाती आली आहे.
एक्सप्रेसमध्ये प्रवाशांपैकी काही जण पत्ते खेळत होते. तक्रारीवरून टीसी डब्यात आल्याने पत्ते खेळणार्या प्रवाशांवर कारवाई करणार आहे. लोणावळ्यामध्ये पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रवाशांनी टीसीची माफी मागून दंड आकारुन सोडण्याची विनंती केली. मात्र टीसी प्रवाशांचे ऐकून घेत नव्हते. त्यामुळे यापैकी एका वृध्दाला हृदयविकाराचा झटका आला, अशी माहिती काही सहप्रवाशांकडून देण्यात येत होती.
हेही वाचा