पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील संत तसेच, शाहू, फुले, आंबेडकर हे पुरोगामी विचार सोडून राजकीय स्वार्थासाठी भाजपसोबत गेलेल्या अजित पवार यांना आम्ही घाबरत नाही. शरद पवार यांचे विचार सोडून विश्वासघात करणार्यांविरुद्ध आमचा संघर्ष राज्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही आहे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक तुषार कामठे यांची निवड झाली.
संबंधित बातम्या :
त्यानिमित्त कासारवाडी येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष कामठे, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, महिला शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, माजी उपमहापौर विश्रांती पाडळे, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, सुलक्षणा धर, देवेंद्र तायडे, शहर प्रवक्ते माधव पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.
आ. पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या कामाची आदरयुक्त भीती आहे. त्यांनी विचार बदलला तेव्हापासून त्यांना घाबरत नाही. भाजपने शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी फोडली. पक्षासह कुटुंब फोडले. फुटलेले आपल्याच लोकांवर खालच्या पातळीवर जाऊन आरोप करीत आहेत. भाजपवाले आरामात हा तमाशा पाहत आहेत. मात्र, अशा परिस्थितीमध्ये भाजपशी कसे दोन हात करायचे हे शरद पवार यांना चांगले माहीत आहे. आम्ही लढत आहोत. हा संघर्ष राज्यभर सुरू आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे थोडक्यात पराभूत झाले. त्या प्रश्नावर आ. रोहित पवार म्हणाले की, निवडणुकीची सर्व जबाबदारी अजित पवार यांच्यावर होती. प्रचार यंत्रणा व नियोजन त्यांचे होते. त्यांनी नेमलेली लोकही त्यांच्यासोबत भाजपाकडे गेली. निवडणुकीत त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करून विश्वासघात केल्याचे सांगता येत नाही, असे सांगत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली.
हेही वाचा