सुप्रियाचे नाव मीच सुचवले, गॉसिप नको; अजित पवार यांचे स्पष्टीकरण

सुप्रियाचे नाव मीच सुचवले, गॉसिप नको; अजित पवार यांचे स्पष्टीकरण

Published on

पुणे : पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदासाठी मीच सुप्रियाचे नाव सुचविले होते. पक्षात सर्वांशी चर्चा झाल्यानंतर सुप्रिया व प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाली. या निर्णयावर मी समाधानी आहे. त्यामुळे कोणीही गॉसिप करण्याचे कारण नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले. आपणास महाराष्ट्रातच रस असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24 व्या वर्धापन दिनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची दिल्लीमध्ये पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर अजित पवार माध्यमांशी न बोलता महाराष्ट्रात परतल्याने ते नाराज असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर विमानतळावर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी सुप्रियाचे नाव आपणच सुचविल्याचे सांगितले.

ते म्हणाले, पवार साहेबांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा, आणि सुप्रियाला कार्यकारी अध्यक्ष करावे, असे मी सुचविले होते. त्यावेळी समितीमधील इतरांनी सध्या केवळ राजीनामा हाच मुद्दा घेऊ, असे मत मांडले. पक्षात लोकशाही असल्याने मी त्यावेळी गप्प राहिलो. सुप्रिया आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली. या निर्णयामुळे मला अजिबात वाईट वाटलेले नाही. त्यामुळे मी नाराज असल्याच्या बातम्या देणे आता बंद करा. माझे विमानाचे बुकींग होते म्हणून मी दिल्लीत माध्यमांना न बोलता निघालो. मी समाधानी आहे.

कोणी नाक खुपसायचे कारण नाही

शरद पवार हे एका पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत, ते त्यांचे मत व्यक्त करतात. तसेच देवेंद्र फडणवीस भाजपचे नेते आहेत. ते त्यांचे मत मांडतात. कोणी काय म्हणाले म्हणून नाराज व्हायचे काहीच कारण नाही. निवड करणे हा आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यात इतरांना नाक खुुपसण्याचे कारण नाही, असेही अजित पवार यांनी विरोधकांना सुनावले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news